Pages

Saturday, 2 February 2013

चिंचवडचे सायन्स पार्क येत्या आठवड्यात खुले

चिंचवडचे सायन्स पार्क येत्या आठवड्यात खुले पिंपरी-चिंचवड महापालिका, राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद आणि केंद्र सरकारचा सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथे उभारण्यात आलेले प्रादेशिक विज्ञान केंद्र (सायन्स पार्क) पुढील आठवड्यात खुले होत आहे. भरधाव वेगाने विकसित होणाऱ्या उद्योगनगरीच्या शिरपेचातील हा मानाचा तुरा असणार आहे. साडेसात एकरातील या केंद्रासाठी सुमारे पावणेदहा कोटी रुपये खर्च आला. चाकाचा शोध केव्हा व कसा लागला यापासून आजवरच्या प्रगत वाहन उद्योगाच्या वाटचालीचे स्वतंत्र दालन आहे. विविध प्रकारची ऊर्जा, ग्लोबल वॉर्मिंग आणि बदलत्या ऋतुमानाचे धडे देणारी दोन दालने माहिती आणि प्रबोधन करतात. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, भूगोल, भूगर्भशास्त्र, जैवविज्ञान, इलेक्‍ट्रॉनिक्‍स इंजिनिअरिंगविषयी मनोरंजनातून विज्ञान शिकविणारे दालन लहानथोरांसाठीचे मोठे आकर्षण आहे. याशिवाय वीस आसन क्षमतेच्या लघुतारांगणातून आकाशगंगेचे दर्शन होते. शैक्षणिक परिसंवाद, कार्यशाळा, दृक्‌श्राव्य व्याख्याने, संगणक अभियान, प्रश्‍नमंजूषा, अंधश्रद्धा निर्मूलन, माहितीपट आदी उपक्रमांसाठी दीडशे प्रेक्षकांसाठीचे स्वतंत्र सभागृह आहे.

No comments:

Post a Comment