Tuesday 3 June 2014

गोपिनाथ मुंडे यांचे कार अपघातात निधन

भाजपाचे नेते केंद्रीय मंत्री गोपिनाथ मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला असून या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्याच्यावर दिल्लीतील एम्समधील ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरु असतांना त्यांचे आज सकाळी ८ वाजता निधन झाले.

पिंपरीत ‘ई-टेंडिरग’ पद्धतीला यश

पिंपरी पालिकेने 'ई-टेंडर' पद्धत सुरू केली, तेव्हा प्रस्थापित मंडळींकडून तीव्र विरोध झाला. 'ई-टेंडर'चे प्रशिक्षण उधळून लावण्यात आले होते. प्रत्यक्षात गेल्या सहा वर्षांत या पद्धतीला यश मिळाल्याचे चित्र पुढे आले असून, आतापर्यंत एक हजार निविदा काढण्यात आल्या असून ज्याची किंमत ३२०४ कोटी इतकी आहे.

महापौरांचा 'महापौर निधी' स्वतःच्या वार्डात

पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले
शहरातील आपत्तीजन्य परस्थितीत वापरण्यासाठी असणारा महापौर विकास निधी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर स्वत:च्याच प्रभागातील विकास कामांवर खर्च करीत असल्याचे समोर आले आहे. स्थायी समितीने नुकत्याच झालेल्या एका बैठकीत हा विषय ऐनवेळी मंजूर केला. त्यामुळे महापालिकेच्या राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे.

यंदा महापालिका करणार रस्त्यांच्या दुतर्फा 'वृक्षारोपण'

50 हजार वृक्षांची लागवड करण्याच संकल्प
मागील वर्षी महापालिकेने लष्कराच्या जागेत एक लाख झाडे लावण्याचे उदिष्ट ठेवले होते. मात्र, परवानगी प्रक्रिया अभावी त्यांना ते ध्येय गाठता आले नाही. त्याचा अनुभव पाहता यंदा महापालिकेने स्वत:च्याच हद्दीत सुमारे 50 हजार वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांनी स्थापत्य व उद्यान विभागाच्या अधिका-यांची बैठक घेऊन सर्वेक्षणाचा आढावा घेतला. तर लागवडीच्या झाडांची संख्या वाढविण्याचे आदेश दिले आहेत.

बहिणाबाई सर्पोद्यानातील मगरीने १९ पिल्लांना जन्म दिला

पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या आकुर्डी येथील निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयातील 'मनी' या मगरीने १९ पिल्लांना जन्म दिला आहे. त्यामुळे उद्यानातील मगरींची संख्या आता २६ झाली असून त्यांचे पाालनपोषण आणि त्यांच्या विहारासाठीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ही पिल्ले इतर प्राणीसंग्रहालयांना देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन आहे.

बारावीच्या परीक्षेत पिंपरी-चिंचवड शहराचा निकाल 93.98 टक्के

14 विद्यालयांचा निकाल शंभर टक्के 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेत पिंपरी-चिंचवड शहराचा निकाल 93.98 टक्के लागला. निकालामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. एकूण निकालामध्ये गतवर्षीच्या तुलनेत 17 टक्क्यांची वाढ झाली आहे. तब्बल 14 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विद्यार्थी व पालकांनी संगणकाबरोबरच मोबाईलमधील इंटरनेटव्दारे निकाल जाणून घेतला. सायबर कॅफे गर्दीने फुल्ल झाले होते.