Saturday, 1 December 2012

कारखान्यांच्या जंगलात आढळले दुर्मिळ उदमांजर ; महापालिकेच्या उपचारानंतर जीवदान

कारखान्यांच्या जंगलात आढळले दुर्मिळ उदमांजर ; महापालिकेच्या उपचारानंतर जीवदान
पिंपरी, 1 डिसेंबर
मुख्यत्वे पश्चिम घाटामध्ये आढळणा-या उद्‌मांजराचे पिल्लू पिंपरी-चिंचवड शहरात जखमी अवस्थेत सापडले आहे. महापालिकेच्या पशूवैद्यकीय विभागामार्फत त्याच्यावर वेळीच उपचार झाल्याने त्याला जीवदान मिळाले आहे. प्राणीविश्वामध्ये दुर्मिळ असले तरीही रेबीजच्या प्रसारासाठी धोकादायक असणा-या या उदमांजराला उपचारानंतर वनअधिका-यांच्या मदतीने निसर्गात सोडून दिले जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड ही कामगारनगरी. कारखान्यांबरोबरच इमारतींच्या जंगलात एखादा वेगळा प्राणी दिसला की त्याचे शहरवासियांना अप्रुप वाटते. गुरुवारी (दि. 15) रात्रीच्यावेळी कामावरुन घरी परतणा-या एका कामगाराला भोसरी-टेल्को रस्त्यावर टाटा मोटर्स कंपनीजवळ उंदरासारखे निमुळते तोंड मात्र अंगावर काळे पट्टे असलेला हा छोटासा प्राणी जखमी अवस्थेत आढळला. उंदीर, खारुताई आणि मुंगूस यांच्यासारखेच बरेचसे साम्य असलेला हा छोटा प्राणी दुर्मिळ असावा, हे त्याच्या लक्षात आले. त्याने तातडीने महापालिकेच्या पशूवैद्यकीय विभागाला याबाबत माहिती दिली.

महापालिकेच्या चिंचवड येथील निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी उद्यानाचे संचालक अनिल खैरे यांनी जखमी अवस्थेतील या पिल्लाला उद्यानामध्ये आणले. महापालिकेचे पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गोरे यांनी त्याच्यावर उपचार केले. त्याच्या शेपटीला व मागील पायाला जखमा आहेत. त्याच्या प्रकृतीमध्ये झपाट्याने सुधारणा झाली आहे. उदमांजर प्राण्यांबरोबरच माणसाला चावल्यास रेबीजची लागण होते. रेबीजच्या प्रसारासाठी उदमांजराचा निवासी भागामध्ये वावर असणे धोक्याचे आहे. त्यामुळे या पिल्लाच्या जखमा ब-या झाल्यानंतर त्याला वनअधिका-यांच्या मदतीने निसर्गात सोडले जाणार असल्याचे डॉ. गोरे यांनी सांगितले.

उदमांजराविषयी अधिक माहिती देताना अनिल खैरे म्हणाले की, अंदाजे एक महिन्याचे वयोमानाची ही उदमांजराची मादी आहे. टाटा मोटर्स कंपनीच्या वनराईतून हे पिल्लू रस्त्यावर आले असावे. उदमांजर पश्चिम घाटामध्ये आढळते. इतर ठिकाणी विशेषतः शहरी भागामध्ये हे मांजर आढळणे दुर्मिळ आहे. केळी व अंडी हे खाद्य त्याला आवडते. ते शाकाहारी आणि मांसाहारी देखील आहे. याला मसण्यामांजर, ऊद या नावानेही ओळखले जाते. जंगलामध्ये त्याचा अधिवास असतो. निशाचर असल्याने ते रात्रीच्यावेळीच बाहेर पडते. त्यामुळे ते दिवसा सहसा दिसत नाही. पिंपरी-चिंचवड शहरात चार वर्षांपूर्वी उदमांजर सापडले होते, असेही त्यांनी सांगितले.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

चुलत भावावर खुनीहल्ला करणारे सख्खे भाऊ गजाआड

चुलत भावावर खुनीहल्ला करणारे सख्खे भाऊ गजाआड
पिंपरी, 1 डिसेंबर
व्यावसायिक वादातून चुलत भावावर कोयत्याने खुनी हल्ला करणा-या दोन सख्खा भावांना खडकी पोलिसांनी अटक केली आहे. बोपोडीतील आदर्शनगर येथे शुक्रवारी (दि. 30) सायंकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली.

बिलाल उस्मान शेख (वय-21, रा. आदर्शनगर, बोपोडी) असे खुनी हल्ल्यात जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी बिलालचे चुलत भाऊ गफार महेबूब शेख (वय-25) व इब्राहिम महेबूब शेख (वय-20, दोघेही रा. आदर्शनगर, बोपोडी) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. बिलाल व गफार यांचा प्लास्टिक भंगाराचा व्यवसाय आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिलाल हा गफार व इब्राहिम यांचा चुलत भाऊ आहेत. यापूर्वी गफर यांची वाहने तोडली होती. पूर्वीचे भांडण आणि व्यवसायाच्या वादातून गफार व इब्राहिम यांनी बिलाल याच्यावर कोयत्याने डोक्यावर, हातावर वार केले. जीवे मारण्याच्या उद्देशाने गफार व त्याच्या भावाने बिलालवर कोयत्याने हल्ला चढविला. या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बी. आर. लोंढे तपास करीत आहेत.
www.mypimprichinchwad.com

शेतक-यांचा थेट माल विक्रीला उत्तम प्रतिसाद

शेतक-यांचा थेट माल विक्रीला उत्तम प्रतिसाद
पिंपरी, 1 डिसेंबर
राज्यात नाशवंत शेतमालावर सरसकट सहा टक्के आडत आकारण्याच्या राज्यशासनाच्या निर्णया विरोधात आडत व्यापा-यांनी संप पुकारला आहे. मात्र पिंपरी उपबाजार समितीने आजपासून (शनिवार) सुरू केलेल्या शेतकरी ते ग्राहक अशा थेट माल विक्रीला शेतक-यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

याबाबत अधिक माहिती देताना बाजार समितीच्या पिंपरी-चिंचवड उपबाजार विभागप्रमुख एन. डी. घुले म्हणाले की, आडत व्यापा-यांनी जरी संप पुकारला असला तरी बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांच्या आदेशानुसार शेतक-यांचे नुकसान होऊ नये यासाठी पिंपरी आणि चिंचवड याठिकाणी शेतक-यांचा शेतमाल विकण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

या दोन्ही ठिकाणी शेतक-यांचा शेतमाल विक्रीला उत्तम प्रतिसाद मिळाला. संप असलातरी आज मार्केटमध्ये मालाची चांगली आवक झाली होती. फळ आणि भाजीपाळ्याची 111 क्विंटल, तर एक लाख बार हजार पालेभाज्यांची आवाक झाली. शिवाय शेतक-यांच्या मालावर कोणतीही आडत न घेता शेतक-यांना रोखीने पैसे देण्यात आले. फुलबाजारात देखिल फुलांची चांगली आवक झाली. त्यामुळे या संपाचा काही परिणाम शेतमालावर झाला नाही. उलट शेतक-यांना चांगला फायदा मिळाला, असा दावा घुले यांनी केला आहे.

शेतक-यांनी कोणालाही न घाबरत आपला शेतमाल पिंपरी व चिंचवड भाजी मंडई येथे घेऊन यावा. भाजीपाला अथवा फळे याबाबत काही अडचणी असल्यास नीलेश लोखंडे (9011115656) व फुल शेतक-यांनी राजू शिंदे (9860562404) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन एन. डी. घुले यांनी केले आहे.

Know Your Customer form deadline extended till Dec 31

Know Your Customer form deadline extended till Dec 31: Residents who have multiple LPG connections can submit their Know Your Customer (KYC) forms by December 31 as the union government on Friday announced an extension of the deadline by another month.

थिसेनक्रूप कंपनीत वेतनकरार १० हजारांची वाढ

थिसेनक्रूप कंपनीत वेतनकरार १० हजारांची वाढ: पिंपरी येथील थिसेनक्रुप इंडस्ट्रीज व थिसेनक्रुप इंडस्ट्रीज इंडिया वर्कर्स युनियन यांच्यामध्ये नुकताच वेतनकरार करण्यात आला. या करारानुसार, कामगारांना सरासरी दहा हजार रुपयांची वेतनवाढ मिळणार आहे.

उद्योग नगरी बनतेय शॉपिंग नगरी

उद्योग नगरी बनतेय शॉपिंग नगरी: उद्योगनगरी असा नावलौकिक असलेलं पिंपरी-चिंचवड आता शॉपिंग नगरी म्हणून नावारुपाला येतंय. या शहरात भोसरी, आकुर्डी, निगडी, चिखली, खडकी, सांगवी परिसरांत बाजारपेठा विकसित होत असून, तिथं पुणेकरही खरेदीसाठी जाताहेत, हे विशेष.

भाजपच्या पिंपरी शहराध्यक्षांना हवीय दुसरी ‘टर्म’

भाजपच्या पिंपरी शहराध्यक्षांना हवीय दुसरी ‘टर्म’:
भाजपच्या ७५ टक्के पदाधिकाऱ्यांच्या विरोधानंतर नियुक्ती, तीव्र गटबाजीचा फटका, आंदोलनातही दुफळी, समित्यांचा घोळ, मित्रपक्षांशी संघर्ष व प्रतिस्पध्र्याशी सलगी, पालिका निवडणुकीत लाजिरवाना पराभव, वादग्रस्त 'एसएमएस' मुळे झालेली बदनामी, सदस्य नोंदणीचा बोजवारा असे 'कर्तृत्व' सिध्द झाल्यानंतरही शहराध्यक्ष एकनाथ पवार यांना सलग दुसरी टर्म हवी आहे. त्यासाठी त्यांनी जोरदार फिल्डींग लावली असली तरी प्रदेश कार्यकारिणीने मात्र 'रेड सिग्नल' दाखवला आहे.
गोपीनाथ मुंडे गटाच्या विरोधानंतरही गडकरींच्या आशीर्वादाने पवारांची वर्णी लागून विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंच्या उपस्थितीत शिक्कामोर्तबही झाले होते. अजंठानगरच्या पोटनिवडणुकीत विरोधात काम केले म्हणून तसेच लोकसभा निवडणुकीची प्रचारपत्रके गायरानात टाकल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर पक्षाने कारवाई केली होती. मात्र, तरीही त्यांच्याकडे नेतृत्वाची धुरा दिली गेली. पवारांना सहकार्य न करण्याचे धोरण मुंडे गटाने राबवले. बैठका नाहीत, कोअर कमिटीचे त्रांगडे, मतदार व कार्यकर्ते पक्षापासून दुरावलेले. पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी नेत्यांच्या सोयीनुसार भाजपचे उमेदवार ठरले व बदलले गेले. शिवसेनेशी नको तितका संघर्ष झाला. पर्यायाने निवडणुकीत पुरती वाट लागली. पराभवानंतर मोठय़ा गटाने प्रदेशाध्यक्षांना हटवण्याची मागणी केली. मात्र, कारवाई करू म्हणणाऱ्या नेत्यांनीच त्यांना पाठीशी घातले.
शिवसेनेशी जमत नाही म्हणायचे व त्यांच्या मागेपुढे करायचे. महायुतीत जायचे नाही अन् शिवसेनेच्या आंदोलनांमध्ये मिरवायचे, अशी दुहेरी नीती दिसून आली. 'एसएमएस' प्रकरणाने कळसच गाठला. गडकरी गटाचे पाठबळ असल्याचा आव पवार आणतात. मात्र, तिकडून भाव मिळत नसल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. कोणतीही गोष्ट 'मॅनेज' करण्याच्या फाजील विश्वासामुळेच प्रतिकूल परिस्थितीतही आपण पुन्हा अध्यक्ष होऊ, असा पवारांना विश्वास वाटत होता. मात्र, प्रदेश कार्यकारिणीने अपरिहार्य कारणाशिवाय महाराष्ट्रात कोणत्याही जिल्हाध्यक्षास पुन्हा त्याच पदावर बसता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कर्तबगार, संघटनात्मक बांधणी करणारा अथवा पर्यायच नसेल, अशा नेत्याला पुन्हा संधी द्यायची वेळ आलीच तर सुकाणू समिती निर्णय घेईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.