Saturday 1 December 2012

कारखान्यांच्या जंगलात आढळले दुर्मिळ उदमांजर ; महापालिकेच्या उपचारानंतर जीवदान

कारखान्यांच्या जंगलात आढळले दुर्मिळ उदमांजर ; महापालिकेच्या उपचारानंतर जीवदान
पिंपरी, 1 डिसेंबर
मुख्यत्वे पश्चिम घाटामध्ये आढळणा-या उद्‌मांजराचे पिल्लू पिंपरी-चिंचवड शहरात जखमी अवस्थेत सापडले आहे. महापालिकेच्या पशूवैद्यकीय विभागामार्फत त्याच्यावर वेळीच उपचार झाल्याने त्याला जीवदान मिळाले आहे. प्राणीविश्वामध्ये दुर्मिळ असले तरीही रेबीजच्या प्रसारासाठी धोकादायक असणा-या या उदमांजराला उपचारानंतर वनअधिका-यांच्या मदतीने निसर्गात सोडून दिले जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड ही कामगारनगरी. कारखान्यांबरोबरच इमारतींच्या जंगलात एखादा वेगळा प्राणी दिसला की त्याचे शहरवासियांना अप्रुप वाटते. गुरुवारी (दि. 15) रात्रीच्यावेळी कामावरुन घरी परतणा-या एका कामगाराला भोसरी-टेल्को रस्त्यावर टाटा मोटर्स कंपनीजवळ उंदरासारखे निमुळते तोंड मात्र अंगावर काळे पट्टे असलेला हा छोटासा प्राणी जखमी अवस्थेत आढळला. उंदीर, खारुताई आणि मुंगूस यांच्यासारखेच बरेचसे साम्य असलेला हा छोटा प्राणी दुर्मिळ असावा, हे त्याच्या लक्षात आले. त्याने तातडीने महापालिकेच्या पशूवैद्यकीय विभागाला याबाबत माहिती दिली.

महापालिकेच्या चिंचवड येथील निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी उद्यानाचे संचालक अनिल खैरे यांनी जखमी अवस्थेतील या पिल्लाला उद्यानामध्ये आणले. महापालिकेचे पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गोरे यांनी त्याच्यावर उपचार केले. त्याच्या शेपटीला व मागील पायाला जखमा आहेत. त्याच्या प्रकृतीमध्ये झपाट्याने सुधारणा झाली आहे. उदमांजर प्राण्यांबरोबरच माणसाला चावल्यास रेबीजची लागण होते. रेबीजच्या प्रसारासाठी उदमांजराचा निवासी भागामध्ये वावर असणे धोक्याचे आहे. त्यामुळे या पिल्लाच्या जखमा ब-या झाल्यानंतर त्याला वनअधिका-यांच्या मदतीने निसर्गात सोडले जाणार असल्याचे डॉ. गोरे यांनी सांगितले.

उदमांजराविषयी अधिक माहिती देताना अनिल खैरे म्हणाले की, अंदाजे एक महिन्याचे वयोमानाची ही उदमांजराची मादी आहे. टाटा मोटर्स कंपनीच्या वनराईतून हे पिल्लू रस्त्यावर आले असावे. उदमांजर पश्चिम घाटामध्ये आढळते. इतर ठिकाणी विशेषतः शहरी भागामध्ये हे मांजर आढळणे दुर्मिळ आहे. केळी व अंडी हे खाद्य त्याला आवडते. ते शाकाहारी आणि मांसाहारी देखील आहे. याला मसण्यामांजर, ऊद या नावानेही ओळखले जाते. जंगलामध्ये त्याचा अधिवास असतो. निशाचर असल्याने ते रात्रीच्यावेळीच बाहेर पडते. त्यामुळे ते दिवसा सहसा दिसत नाही. पिंपरी-चिंचवड शहरात चार वर्षांपूर्वी उदमांजर सापडले होते, असेही त्यांनी सांगितले.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

No comments:

Post a Comment