Thursday 5 July 2012

पतसंस्थेत लाखोंचा अपहार

पतसंस्थेत लाखोंचा अपहार: चाकण। दि. २0 (वार्ताहर)

लाखो रुपयांची अफरातफर केल्याप्रकरणी चाकण येथील सावित्रीबाई फुले महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या महिला संस्थापक अध्यक्षा शैलजा कोकणेसह संस्थेच्या सचिव, पिग्मी एजंट व अन्य एक अशा एकूण चारजणांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुशील कदम यांनी दिली.

शैलजा शरद कोकणे (वय ४२, रा. म. फुले चौक, चाकण) सचिव स्वाती ऊर्फ विजया श्रीनिवास सोनटक्के (वय ४४, रा. बालाजीनगर, चाकण) पिग्मी एजंट जिजाबाई रामभाऊ पांढरकर (वय ४८ वर्षे) रामभाऊ जयवंत पांढरकर (वय ५२ वर्षे, दोघेही रा. झित्राई चाकण) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

येथील पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पतसंस्थेत स्वाती सोनटक्के या सचिव म्हणून तर जिजाबा पांढरकर या पिग्मी एजंट म्हणून काम पहात होत्या. तसेच जिजाबाई यांचे काम त्यांचे पती रामभाऊ पांढरकर हे बिनबोभाट पहात होते.

२00४ मध्ये सचिव सोनटक्के यांनी आपल्या सचिव पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर २00५ ते २00७ या काळात संस्थेचे सर्व व्यवहार बंद होते. तरीही या कालावधीत पांढरकर यांनी २00५ नंतर ठेवीदारांकडून दै. ठेवी गोळा केल्या. तद्नंतरच्या काळात संस्था बंद पडल्यानंतर अध्यक्षा शैलजा कोकणे यांच्याकडे ठेवीदारांनी आमचे पैसे आम्हाला परत द्या असा तगादा लावला. या कालावधीत आरोपींनी संगनमताने अंदाजे १0 लाखांची रक्कम हडप केली. तगादा लावणार्‍यांना कोकणे यांनी भूलथापा देत ‘‘मी कोर्टात दावा दाखल केला आहे, निकाल लागला की पैसे देईन, दप्तराचे शासकीय ऑडीट तपासणी चालू आहे. सत्य लवकरच बाहेर येईल. पतसंस्थेचे सर्व रेकॉर्ड सचिव स्वाती सोनटक्के यांच्या ताब्यात असून तिनेच हे रेकॉर्ड गायब केले आहे’’ अशी बोंब ठोकली.

याबाबत चाकण पोलिसांनी सहाय्यक निबंधक खेड यांच्याकडून ताब्यात घेतलेल्या अपूर्ण रेकॉर्डवरुन किती रकमेचा अपहार झाला हे स्पष्ट न झाल्याने आरोपींवर सन २0११ मध्ये गुन्हाही दाखल केला होता. त्यानंतर तपासाअंती उपलब्ध झालेल्या रेकॉर्डवरुन अंदाजे १0 लाखांची अफरातफर झाल्याचे सांगितले.

पोलिसांनी आरोपी स्वाती सोनटक्के, जिजाबाई पांढरकर व रामभाऊ पांढरकर यांना १४ जून रोजी अटक केली. आरोपींकडे केलेल्या तपासावरून अध्यक्षा शैलजा कोकणे हिला १८ जून रोजी अटक केली. या सर्व आरोपींना २२ जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात संचालक मंडळाचा संबंध नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. पतसंस्थेच्या या घोटाळ्यात ज्यांची घोर फसवणूक झाली असेल त्यांनी चाकण पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.



फिर्यादी शैलजा कोकणेच निघाली आरोपी...

वारंवार पोलिसांना सतावून शासकीय कामात अडथळा आणणार्‍या फिर्यादी शैलजा कोकणे वरील घटनेबाबत पोलिसांची दिशाभूल करीत असल्याचे समजातच तिला आरोपी बनवून पोलिसांनी गजाआड केले. या घटनेमुळे चाकण परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

No comments:

Post a Comment