Tuesday 4 December 2012

मला गर्व आहे, वडिलांच्या खुनाचा सूड घेतल्याचा !

मला गर्व आहे, वडिलांच्या खुनाचा सूड घेतल्याचा !
पिंपरी, 3 डिसेंबर
'सहा वर्षांपूर्वी गोट्या धावडे याने माझ्या डोळ्यासमोर माझ्या वडिलांचा खून केला... गोट्या तुरूंगातून बाहेर पडल्यानंतरही त्याची टारटूर सुरूच होती... कधी गणपती मिरवणुकांमध्ये दगडफेक, तर वारंवार घरातील मंडळींना शिवीगाळ एवढंच नाही, तर माझा भाऊ रवी यालाही संपविण्याचे षडयंत्र गोटयाने गतवर्षी आखले होते. मग मात्र मनाशी पक्क केलं... गोट्याला संपवायचे....त्याला संपवल्याचा मला गर्व आहे...' गोट्या धावडेच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल लांडगे सांगत होता......

'गोट्याचा त्रास माझ्या जवळील मित्रांनाही होता. त्याच्या त्रासाला कंटाळून बालपणीच्या सवंगड्यांना हाताशी धरून गोट्याला संपविण्याचा बेत आखला... पिस्तुल, तलवारी, कोयत्यांची जमवाजमव केली... पिंपरी कॅम्पातून माकड टोप्यांचीही खरेदी आटोपली.. आणि भोसरी तळ्यावरून दुर्बिणीतून धावडेवस्तीची टेहाळणी सुरू झाली... काम फत्ते व्हावे, यासाठी आठ दिवसांपूर्वी आमच्या जीममध्ये 'जीम'चा कोचर किशोर यांनी पिस्तुलातून गोळीबार करीत गोट्याला संपविण्याची रंगीत तालीम केली... गोट्यावरील 'वॉच' सत्र फळाला आलं... गोट्याला 'परफेक्ट' ठिकाणी गाठून त्याचा पत्ता कट केला... '

भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष अ‍ॅड. अंकुश लांडगे यांची सहा वर्षांपूर्वी हत्या झाली. ही हत्या करणा-या गोट्या धावडेला संपवून वडिलांच्या हत्येचा बदला घेतल्याचे सांगत राहुल लांडगे याने पोलीस आणि प्रसारमाध्यमांच्या पुढे आपण केलेल्या खुनाचे समर्थन केले.

या हल्ल्याची रंगीत तालीम राहुलच्या जीममध्ये झाली. यासाठी लागणारे पिस्तुल नारायणगाव येथून 40 हजार रूपयाला, तर विकी गुप्ता याने एक पिस्तुल बिहार येथून 20 हजार रूपयांना आणले होते. भोसरीतील धावडेवस्ती येथे 29 नोव्हेंबर रोजी भरदुपारी गोट्या धावडे याचा कोयता, तलवारीने खून केला. त्यावेळी चुकून गोळी लागून राहुलचा मित्र अंकुश लाडके ठार झाला.

त्यानंतर राहुल लांडगे, किशोर साखरे, अभिषेक झरे, अब्दुल अहमद, विकास ऊर्फ विक्रांत लांडगे, प्रवीण ऊर्फ चिम्या लांडगे, अजित ऊर्फ विकी गुप्ता हे सात जण टेम्पो धावडेवस्ती परिसरात लावून आय-20 मोटारीतून कुदळवाडीमार्गे देहूगावात पोहोचले.

तुकाराम महाराजांच्या गाथा मंदिराजवळ इंद्रायणी नदीत एक पिस्तुल, चार कोयते, कु-हाड टाकून नगरला गेले. त्यावेळी राहुल, किशोर, अभिषेक तिघे मोटारीतून पुन्हा नगरहून पिंपरीला आले. मुंबईला नातेवाईकांकडे जाताना पोलिसांनी तिघांना निगडी नाक्याजवळ 29 नोव्हेंबरच्या रात्री पकडले. तर अन्य आरोपींना इंद्रायणीनगर परिसरात रविवारी (दि. 2) सायंकाळी पकडले.

राहुल लांडगे (वय-20), किशोर मधुकर साखरे (वय-22), अभिषेक शिवाजी जरे (वय-22, सर्व रा. धावडेवस्ती, भोसरी), अब्दुल वसीम सत्तार अहमद (वय-22, रा. आळंदी रोड, भोसरी), विकास ऊर्फ विक्रांत पोपट लांडगे (वय-22, रा. धावडेवस्ती, भोसरी), प्रवीण ऊर्फ चिम्या पोपट लांडगे (वय-20, रा. धावडेवस्ती, भोसरी), अजित ऊर्फ विकी रामलाल गुप्ता (वय-22, रा. पांजरपोळ, भोसरी) अशी अटक करण्यात आलेल्या सात जणांची नावे आहेत. या सर्व आरोपींना न्यायालयाने 7 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
mypimprichinchwad.com

No comments:

Post a Comment