Monday 24 December 2012

कंपनी व्यवस्थापकावर वार

कंपनी व्यवस्थापकावर वार: - मदत करणार्‍यानींही लुटले; भोसरी-आळंदी रस्त्यावरील प्रकार
पिंपरी । दि. २३ (प्रतिनिधी)

रिक्षाला किरकोळ अपघात झाल्याच्या कारणावरून तिघांनी दुचाकीस्वाराला मारहाण करीत कंपनी व्यवस्थापकावरही वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. शनिवारी रात्री पावणेअकराला भोसरी-आळंदी रस्त्यावर एससीएस शाळेजवळ हा प्रकार घडला. जखमी अवस्थेत तडफडत पडलेल्या व्यवस्थापकाला दोन दुचाकीस्वारांनी मदतीचा हात देऊन वायसीएम रुग्णालयाजवळ सोडले खरे. पण त्यायाजवळील दोन मोबाईल व ५00 रूपये हिसकावून त्यांनीही निर्दयतेचेच दर्शन घडविले.

आप्पासाहेब रवींद्र मगदुम (२४, रा. चाकण) असे त्या दुर्दैवी व्यवस्थापकाचे नाव आहे. त्यांच्यावर थेरगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोटारचालक बाबु सिताराम गवारी (२५, रा. चाकण) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वार करणार्‍या तिघांवर व मुद्देमाल हिसकावून नेणार्‍या दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

चाकणमधील एका कंपनीत व्यवस्थापक असलेले मगदुम हे गवारी यांच्यासमवेत लोहगाव विमानतळाकडे चालले होते. मयुरी पॅलेसजवळ एका रिक्षाने त्यांच्या मोटारीला मागून धडक दिली. त्यामुळे रिक्षा पलटी झाली. त्यामुळे रिक्षातील तिघे त्यांच्याशी वाद घालू लागले. मगदुम आणि गवारी यांनी मोटारीतून उतरून रिक्षा सरळ केली. त्यानंतर पुन्हा ते निघाले. रिक्षावाल्याने पुढे जाऊन त्यांच्या मोटारीला रिक्षा आडवी घातली. त्यामुळे गवारी यांचा रिक्षावाल्याशी वाद झाला. त्यावेळी त्यांना तिघांनी बेदम मारहाण केली. मगदुम मोटारीतून उतरताच त्यांच्या छातीवर, दंडावर आणि पोटावर वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. किरकोळ जखमी झाल्याने गवारी परिसरातील एका दवाखान्यात उपचारासाठी गेला. तर मगदुम मदत मिळेपर्यंत रस्त्यावच पडून होते.

तेथून चाललेल्या दोघांनी मगदुम यांना रुग्णालयात नेण्यासाठी आपल्या दुचाकीवर बसवले. रुग्णालयाजवळ येताच त्यांच्याजवळील १0 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल तसेच ५00 रूपये हिसकावून घेतले. प्राथमिक उपचारांनंतर मगदुम यांना थेरगावातील अतिदक्षता विभागात हलविण्यात आले.

No comments:

Post a Comment