Thursday 27 December 2012

भावाचा बदला घेण्यासाठी मुलीचे अपहरण

भावाचा बदला घेण्यासाठी मुलीचे अपहरण: पिंपरी। दि. २५ (प्रतिनिधी)

भांडण सोडविण्यात मध्यस्थी करणार्‍या मावस भावाचा बदला घेण्यासाठी त्याच्या ९ वर्षीय मुलीला पळवून तिला नदीत बुडवून मारण्याचा प्रयत्न करणार्‍यास पोलीसांनी अटक केली. चिंचवडेनगर येथे हा प्रकार घडला लक्ष्मण गणपत शिंदे (वय ३0, रा. वृंदावन कॉलनी, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शिवाजी भुजंग ननावरे (४0, ओमसाई कॉलनी, चिंचवडेनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

लक्ष्मणला तिसरीही मुलगी झाल्याने त्याचे पत्नीशी भांडण सुरू होते. त्यामुळे त्याची मोठी मुलगी मनिषा घाबरली. ती जवळच राहणार्‍या ननावरे यांच्या घरी धावत आली. ननावरे यांनी भांडण सोडविल्याने लक्ष्मणला त्याचा राग आला. या रागातूनच सायंकाळी सहाच्या सुमारास त्याने ननावरेंची मुलगी मनीषा हिला दमदाटी करून मोटरसायकलवर बसविले. तिच्या बहिणीने घरी सांगितल्यावर कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला.

लक्ष्मण मनीषाला देहूच्या भंडारा डोंगर परिसरात घेऊन गेला. ननावरे यांच्या परिचयातील सलून व्यावसायिक दीपक क्षीरसागर यांचे त्या परिसरात दुकान आहे. त्यांनी मनीषाला ओळखले. ननावरे यांना फोन करून मनीषा कुठे आहे, अशी विचारणा केली. त्यावर ती बेपत्ता असून आम्ही तिचा शोध घेत असल्याचे ननावरे यांनी त्यांना सांगितले. तोपर्यंत लक्ष्मण तिला नदीपात्राजवळ नेऊन पाण्यात बुडविण्याचा प्रयत्न करीत होता.

दीपक यांनी लक्ष्मणकडे धाव घेऊन मित्रांच्या मदतीने मनीषाची सुटका केली. जमावाने लक्ष्मणला बेदम चोप दिला. त्याला चिंचवडमध्ये आणून पोलिसांच्या ताब्यात दिले. लक्ष्मण हा वाहनचालक आहे, तर ननावरे बिगारी काम करतात.

No comments:

Post a Comment