Friday 21 December 2012

निघाले होते लग्नाला. पोहचले बारशाला..

निघाले होते लग्नाला. पोहचले बारशाला..: पुणे। दि. २0(प्रतिनिधी)

गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याच्या दिशेने स्वारगेटहून साडेपाच वाजता बस निघाली खरी, पण ती दापोडी, चिंचवड, निगडी असे स्टॉप घेत घेत पुढे गेली आणि रात्री पावणेआठला गहुंजे स्टेडियमजवळ पोचली. तोपर्यंत सतरा ‘ओव्हर’टाकून झाल्या होत्या.

पुणेकरांना क्रिकेट सामन्याचा लाभ घेता यावा यासाठी पीएमपीएमएलने सायंकाळी साडेपाच आणि साडेसहा अशा दोन वेळांना थेट बस सोडण्याचे बुधवारी जाहिर केले. पुणेकरांनी या सामन्याची तीन हजार ते दहा हजार रूपयांची तिकीटे ‘बुक’केली होती. बस तिकडे जाणार असे समजल्यावर खासगी वाहनांपेक्षा सार्वजनिक बसने जाणे अनेकांनी पसंत केले. या बससाठी साठ रूपये तिकीटदर होता. सायंकाळी साडेपाच वाजता बस बीआरटी स्थानकाजवळ लागली खरी, पण तिच्याबाबत घोषणा होत नसल्याने प्रवासी संभ्रमित होते. ही बस पाऊणतासाने गहुंजे स्टेडियमला पोचली. सामना सात वाजताच सुरू झाला होता. आपल्याला सामना सुरूवातीपासून पाहता आला नाही याबाबत प्रेक्षकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. बस पौड रस्ता, चांदणी चौकमार्गे थेट का नेली गेली नाही? असा प्रश्न त्यांनी केला. सायंकाळी साडेसहाची बस किती वाजता पोचली याबाबत प्रश्नचिन्हच होते.

पुढच्या वेळी लवकर सोडू पीएमपीएमएलचे जनसंपर्क अधिकारी दीपक परदेशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडी असल्याने बसना उशीर झाला असावा, असे कारण सांगितले. ठिकठिकाणी प्रवासी असल्याने बसला थांबावे लागले. बस पोचायला नेहमी दीड तास लागतो, असे नमूद करून ‘पुढच्या वेळी लवकर बस सोडू’असे सांगायलाही ते विसरले नाहीत.

No comments:

Post a Comment