Friday 14 December 2012

भंगार विक्रेत्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी चौघांना अटक

भंगार विक्रेत्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी चौघांना अटक
पिंपरी, 11 डिसेंबर
भंगार विक्रेत्याकडून एक लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी चार जणांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वी या प्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे राष्ट्रवादीचे नगरसेवक रोहित उर्फ अप्पा काटे आणि अन्य दहा जणांवर भोसरी पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला होता.

दिनेश वामन आवळे (वय 22 रा. कर्नावट ताळ, दापोडी), शंकर बाबुराव गायकवाड (वय 23 रा. सिध्दार्थनगर दापोडी), नीलेश रामदेव दंवर (वय 23 रा. दापोडी) आणि सुशांत विलास वंजारी (वय 22 रा. दापोडी) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. या चौघांना भोसरी पोलिसांनी संध्याकाळी चार वाजता अटक केली. या प्रकरणी कुणाल सतीश सेठिया (वय-22, रा. पुणे-मुंबई रस्ता, बापोडी) यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेची पार्श्वभूमी अशी की, दापोडी येथील एसटी वर्कशॉपमधून सेठिया यांनी 37 भंगार गाड्या खरेदी केल्या आहेत. त्यापैकी 25 गाड्या यापूर्वी ते घेऊन गेले. मागील रविवारी (ता. 9) सकाळी साडेसात वाजता उर्वरित 12 गाड्यांच्या वाहतुकीसाठी सेठीया वर्कशॉपमध्ये जात असताना दोन दुचाकीवरून आणि कारमधून आलेल्या काही जणांनी सेठीया यांना रस्त्यात अडवून 'अप्पा काटे यांच्या कार्यालयामध्ये एक लाख रूपये भरा, त्यानंतर भंगार गाड्या घेऊन जा' अशी धमकी दिली. परंतु सेठिया यांनी खंडणी देण्यास नकार दिल्याने आरोपींनी सेठीया यांना शिवीगाळ करून दमदाटी केली. सेठिया यांनी भोसरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी चौकशीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे राष्ट्रवादीचे नगरसेवक रोहित अप्पा काटे आणि अन्य दहा जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक नाईकवडे तपास करीत आहेत.
mypimprichinchwad.com

No comments:

Post a Comment