Friday 28 December 2012

भरारी पथकांची कर्मचार्‍यांवर ‘नजर’

भरारी पथकांची कर्मचार्‍यांवर ‘नजर’: पिंपरी । दि. २७ (प्रतिनिधी)

महापालिकेतर्फे पुरविण्यात येणार्‍या सेवासुविधांचा दर्जा, प्रशासनाकडून नागरिकांना मिळणारी वागणूक तसेच कामचुकार, वेळेवर कामावर न येणार्‍या कर्मचार्‍यांना वठणीवर आणण्यासाठी ६ भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. १ जानेवारीपासून ही पथके कार्यरत होणार आहेत, अशी माहिती आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

मार्चनंतरच्या अनधिकृत बांधकामांवर बेधडक मोहीम राबविणार्‍या आयुक्तांनी प्रशासनास शिस्त लावण्याची मोहीम हाती घेतली आहे. डॉ. परदेशी म्हणाले, ‘‘महापालिकेच्या विविध ५९ खात्यांत ७ हजार ४00 कर्मचारी काम करतात. ठेकेदारेनेही हजारो कर्मचारी काम करीत आहेत. महापालिका मुख्यालयापासून ते रु ग्णालयामध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांबाबत अनेक तक्र ारी आल्या आहेत. नागरिकांना चांगली वागणूक मिळत नाही. काही महाभाग हजेरी लावून घरी निघून जातात. तर काही उशिराने कामावर येतात; तसेच महापालिकेच्या सेवासुविधांचा दर्जा चांगला नाही, विविध प्रकारचे दाखले वेळेवर मिळत नाहीत, अशा स्वरूपाच्या तक्रारी आल्या होत्या. मुख्यालयातील विविध विभागांसह, प्रभाग, विभागीय कार्यालये, जकात नाके, करसंकलन, नागरी सुविधा केंद्र, रुग्णालये आदी ठिकाणांची अचानकपणे तपासणी केली जाणार आहे. नागरिकांना दिली जाणारी वागणूक याची शहानिशा करणार असून कोणाचीही गय केली जाणार नाही.’’

एक कर्मचारी तर महापालिकेचा पगार घेऊन तलाठी कार्यालयात काम करीत असल्याचा प्रकार समजला आहे. त्यामुळे शिस्तबद्ध व लोकाभिमुख प्रशासनासाठी भरारी पथक स्थापन केले आहे. सहायक आयुक्तांच्या नियंत्रणाखाली ही पथके कार्यरत राहतील. १ जानेवारीपासून ही पथके कार्यरत होणार आहेत. महापालिका मुख्यालयाकडून तपासणी करावयाच्या ठिकाणाचा सांकेतिक क्रमांक अचानकपणे पथकाला दिला जाईल. त्यानुसार पथक तपासणीसाठी जाईल, त्यामुळे कामात कसूर करणार्‍यांना रंगेहात पकडणे शक्य होईल.

- श्रीकर परदेशी, आयुक्त

No comments:

Post a Comment