Friday 25 January 2013

‘आधार’साठी हेल्थकार्डचा आधार

‘आधार’साठी हेल्थकार्डचा आधार: संजय माने । दि. २३ (पिंपरी)

वास्तव्याचा कोणताही पुरावा नाही, अगदी अलीकडच्या काळात नोकरीच्या शोधात शहरात दाखल झाल्यामुळे कागदोपत्री पुरावा सादर करणे अशक्य झाले. पावलोपावली अत्यावश्यक होऊ लागलेले आधार कार्ड कसे काढणार? ही अडचण निर्माण झालेल्यांना कोणीतरी शक्कल लढवून महापालिकेतून मिळणार्‍या हेल्थकार्डचा पर्याय सुचविला. नोंदणी केंद्रावरील काहींनी विशिष्ट रक्कम मिळत असल्याच्या मोबदल्यात हा पर्याय ग्राह्य मानल्याने आधार कार्ड सहजपणे मिळू लागले. आधारकार्डसाठी हेल्थ कार्डच खरे आधार बनल्याने हेल्थ कार्डसाठी वायसीएम रुग्णालयात गर्दी होऊ लागली आहे.

अनेक वर्षांपासून शहरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांकडे मतदार ओळखपत्र, शिधापत्रिका, वाहन चालविण्याचा परवाना, बँकेचे खातेपुस्तक असे पुरावे आहेत. तरीही सहजपणे आधारकार्ड मिळत नाही. आधार कार्ड नोंदणीसाठी दोन ते तीन महिन्यांच्या प्रतीक्षा यादीचे टोकन दिले जाते. ज्यांच्याकडे पुरावे नाहीत, त्यांना मात्र सहाशे रुपये मोजले, पुराव्यासाठी वायसीएम रुग्णालयाचे हेल्थकार्ड सादर केले की चार दिवसांत आधार कार्ड मिळते. हा आश्‍चर्यकारक प्रकार महापालिका हद्दीतील विविध केंद्रांवर सुरू आहे.

परप्रांतीय व्यक्तींनाही आधारकार्ड सहज मिळू लागले आहे. गॅसचे अनुदान असो की, शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड अनिवार्य ठरू लागले आहे. त्यामुळे प्रत्येकाची आधारकार्ड मिळविण्यासाठी धडपड सुरू आहे. वास्तव्याच्या पुराव्यासंदर्भातील रितसर कागदपत्र देऊनही एकीकडे आधारकार्ड लवकर मिळत नाही, तर दुसरीकडे कोणताही पुरावा नसलेल्यांच्या हाती आधार कार्ड पडू लागले आहे. हेल्थकार्डच्या

आधारे आधारकार्ड मिळवून देणार्‍यांची साखळी तयार झाली आहे. या साखळीच्या माध्यमातून पैसे देऊन आधार कार्ड मिळविणे सोपे झाले आहे. मात्र, या घातक प्रकाराकडे प्रशासन किंवा पोलिसांनी गांभीर्याने लक्ष दिलेले नाही.

काही महिन्यांपूर्वी वायसीएममध्ये हेल्थकार्डसाठी येणार्‍यांची संख्या नगण्य होती. आधार कार्ड नोंदणी केंद्र सुरू झाल्यापासून हेल्थकार्ड घेणार्‍यांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. वायसीएम रुग्णालयात केस पेपर मिळतो, त्या खिडकीच्या शेजारच्या खिडकीजवळ गेल्यानंतर हेल्थकार्डची मागणी करताच केवळ तीस रुपयांत काही मिनिटांत हेल्थकार्ड हातात पडते. रहिवासी पुरावा अल्पावधीत उपलब्ध करण्याचा सोपा पर्याय उपलब्ध झाल्याने हेल्थकार्डची मागणी वाढली आहे. हेल्थकार्डासाठी रांगा लागू लागल्याने वाय सी एम च्या कर्मचार्‍यांवर कामाचा ताण वाढला आहे.

No comments:

Post a Comment