Tuesday 8 January 2013

मेट्रोसाठी दिल्लीत बैठक

मेट्रोसाठी दिल्लीत बैठक: पुणे। दि. ६ (प्रतिनिधी)

पुणे मेट्रोचा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी केंद्रीय नगरविकासमंत्री कमलनाथ यांच्याबरोबर महापालिकेतील सर्वपक्षीय गटनेत्यांची १0 जानेवारीला दिल्लीत बैठक घेण्यात येईल, असे आश्‍वासन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज दिले.

केंद्र शासन व राज्य शासनाकडे शहरातील विविध प्रकल्पांचे प्रस्ताव मान्यतेसाठी प्रलंबित आहेत. त्याविषयी शरद पवार यांच्याबरोबर महापौर वैशाली बनकर, उपमहापौर दीपक मानकर, स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेरे, सभागृहनेते सुभाष जगताप, विरोधी पक्षनेते वसंत मोरे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, भारतीय जनता पक्षाचे गटनेते अशोक येनपुरे, शिवसेना गटनेते अशोक हरणावळ, रिपब्लिकन पक्षाचे गटनेते डॉ. सिध्दार्थ धेंडे यांची बैठक झाली. त्यावेळी मेट्रो, नदीसुधार प्रकल्प, पाणी प्रक्रिया, शिवसृष्टी आदी विषयांवर तब्बल सव्वातास चर्चा झाली. अतिरिक्त नगर अभियंता श्रीनिवास बोनाला उपस्थित होते. कृषी महाविद्यालयाचा हरित पट्टा उठवून त्याठिकाणाहून मेट्रो मार्ग जाणार आहे का ? असा सवाल पवार यांनी उपस्थित केला. त्यावेळी महाविद्यालय परिसरातून भुयारी मार्गाद्वारे मेट्रो जाणार असल्याचे अधिका-यांनी सांगितले.

महापालिकेने कोथरुड येथे प्रस्तावित केलेल्या शिवसृष्टी प्रकल्पाला राज्य शासनाकडून अद्याप मान्यता मिळत नाही, अशी तक्रार दीपक मानकर यांनी केली. त्यावेळी राज्य शासनाकडे प्रलंबित प्रकल्पाविषयी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर चर्चा करून लवकरच बैठक घेण्यात येईल, असे आश्‍वासन पवार यांनी दिले.



लोंढय़ांचाही विचार करा!

शहर विकास आराखड्यातून पुन्हा अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) निर्माण होत असल्याने पुण्यात लोकसंख्येचा लोंढा वाढणार आहे, असा प्रश्न वसंत मोरे यांनी उपस्थित केला. शहरातील वाढती लोकसंख्या व खासगी वाहनांच्या वापराविषयी शरद पवार यांनीही चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, शहराचा विकास करताना वाढत्या लोकसंख्येचाही विचार करा !

No comments:

Post a Comment