Thursday, 19 May 2016

[Video] दुष्काळग्रस्तांची भूक भागविण्यासाठी टीसीएसची धाव

एमपीसी न्यूज - सध्या महाराष्ट्रातील मराठवाडा, खानदेश सारखे भाग दुष्काळाच्या झळांनी होरपळून निघत आहेत. त्यांना पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी वेळोवेळी स्वतः किंवा नाम फाउंडेशनच्या माध्यमातून रोख रक्कम किंवा इतर साहित्याच्या माध्यमातून मदत केली आहे. त्याच मदतीचा कळस म्हणजे टीसीएस (टाटा कन्सलटंन्सी अॅन्ड सर्व्हिसेस) ग्रुपने दाखवलेले औदार्य होय. टीसीएसतर्फे याच दुष्काळग्रस्तांसाठी अवघ्या चार दिवसात तब्बल 28 टन धान्य गोळा करून त्यांनी नाम फाउंडेशनला सुपूर्द केले आहे. याविषयी माहिती देताना पिंपरी-चिंचवडमधील नाम फाउंडेशनचे सदस्य धनंजय शेठबळे म्हणाले की, टीसीएस ग्रुपने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की, शहरातील लोक केवळ बोलतच नाहीत तर ते कृतीशील सुद्धा आहेत. त्यामुळे त्यांनी नामला दिलेली ही मदत दुष्काळग्रस्तांसाठी लाखमोलाची ठरणार आहे. त्यांनी अवघ्या चारच दिवसात रात्रंदिवस एकत्र करून टीसीएसच्या कर्मचारी व इतर इच्छुकांच्या माध्यमातून तब्बल 28 टन धान्य गोळा केले आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने तांदूळ, गहू, बाजरी, ज्वारी, साखर व डाळींचा समावेश आहे. हे धान्य मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर हिंगोली या चार जिल्ह्यात 1600 कुटुंबांना वाटप केले जाईल. ज्यामध्ये साधारण पाच किलो तांदूऴ, पाच किलो गहू, पाच किलो ज्वारी किंवा बाजरी व एक-एक किलो साखर व डाळी, असे वाटप केले जाणार आहे. यासाठी नाम फाउंडेशनचे स्वयंसेवक व टीसीएसचे 15 स्वयंसेवक, बजाज ऑटो, तसेच शहरातील स्वयंसेवी संस्था ज्यामध्ये पीसीसीएफ, वृक्षवल्ली, सावरकर मंडळ आदी स्वइच्छेने सहभागी होत आहेत, अशी माहिती शेठबळे यांनी दिली. टीसीएसच्या मदतीचा हा 'पसा' नक्कीच काही प्रमाणात का होईना दुष्काळग्रस्तांची भूक मिटवणार आहे. जेणेकरून पावसाळ्यात बळीराजा जोमाने शेतकामाला लागेल व त्याच्या शेतात स्वतःचे धान्य पिकवेल.

No comments:

Post a Comment