Friday 2 June 2017

[Video] मेट्रोच्या कामाला कासारवाडीपासून सुरुवात

पिंपरी ते स्वारगेट मार्गावरील प्रस्तावित मेट्रोच्या कामाला कासारवाडीपासून सुरुवात झाली आहे. गुरुवारी (दि.25) पासून या कामाला सुरुवात करण्यात आली. मेट्रोचा मार्ग ग्रेडसेपरेटरमधून राहणार आहे. यामुळे याठिकाणी 250 मीटरच्या टप्प्यांमध्ये हे काम करण्यात येणार आहे. पिंपरी ते रेंजहिल्स दरम्यानचा मेट्रोचा मार्ग एलिव्हेटेड राहणार असल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा असणा-या वृक्षांना जीवदान मिळाले आहे. दोन वर्षांमध्ये हे काम पूर्ण होणार आहे. महामेट्रोने पहिल्या टप्प्यात पिंपरी ते रेंजहिल्स दरम्यानचे 10.75 किलोमीटर अंतराचे काम पूर्ण करण्याचे निश्चित केले आहे. पिंपरी ते रेंजहिल्स दरम्यानच्या मेट्रोमार्गावर नऊ स्टेशन्स प्रस्तावित करण्यात आली आहेत. मेट्रोचा मार्ग एलिव्हेटेड राहणार असल्याने सर्व स्टेशन्स वरच्या बाजूला राहणार आहेत. मेट्रोला स्टेशन्ससाठी जागेची आवश्‍यकता भासणार आहे. त्यासंदर्भात महा मेट्रोच्या व्यवस्थपकांनी महापालिकेबरोबर पत्रव्यवहार केला आहे. ग्रेड सेपरेटरच्या बाजूला असणा-या बीआरटी मार्गावर करण्यात आलेल्या थांब्याचा वापर मेट्रो स्टेशनसाठी होऊ शकतो. मेट्रोचे काम सुरू असताना वाहतूक कोंडी होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे. मेट्रोचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांना देण्यात आली आहे. महामेट्रोकडून काम सुरू असताना वाहतूक कोंडी होणार नाही, याची खबरदारी घेण्यात येणार असली तरी नाशिक फाटा चौकामधील वाहतूक कोंडीमध्ये भर पडण्याची चिन्हे आहेत. शुक्रवारी सकाळीच या ठिकाणी अपघात झाला आहे.

No comments:

Post a Comment