Tuesday 3 October 2017

सराईत गुन्हेगाराकडून 40 तोळे सोने हस्तगत

पिंपरी - निगडी पोलिसांनी अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराकडून 40 तोळे चोरीचे सोने हस्तगत केले आहे. त्याच्याकडून घरफोडीचे 16 गुन्हे उघड झाले आहेत.                                      
निखिल ऊर्फ मॉन्टी दत्तात्रेय कंगणे (वय 23, रा. एकता सोसायटी, विजय म्हेत्रे बिल्डिंग, चिखली) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखलीतील संजय तापकीर यांचे कुटुंब मंगळवारी (ता. 26) रात्री साडेआठ ते साडेदहाच्या दरम्यान घराला कुलूप लावून दांडिया खेळण्यासाठी गेले होते. त्या वेळी कंगणे याने तापकीर यांच्या घराचे व कपाटाचे कुलूप तोडून सोने-चांदीचे दागिने व मोबाईल असा साडेबारा लाखांचा ऐवज चोरून नेला. याबाबत तापकीर यांनी पोलिसांना कळवताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता, कंगणे घटनास्थळी आल्याचे निदर्शनास आले. मात्र, त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. कंगणे हा सराईत चोर असल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्‍या दाखवताच त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. तसेच त्याच्याकडून इतरही पंधरा गुन्हे उघडकीस आले. पोलिसांनी त्याच्याकडून एकूण 40 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.                                                   

No comments:

Post a Comment