Friday 7 December 2018

थकीत महसुलामुळे शेकडो वाहने जप्त

“आरटीओ’ ची कारवाई : वाहनांच्या लिलावाची तयारी
पिंपरी – शासनाचा थकवलेला महसूल व कागदोपत्राची पूर्तता न केल्याने पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अनेक वाहने जप्त केली. मोशी येथे स्थलांतरित झालेल्या “आरटीओ’ कार्यालयात जप्त वाहनांची संख्या वाढत आहे. यामुळे दुचाकी वाहन तपासणी ट्रॅकची जागा या वाहनांनी व्यापली. महसूल बुडवणे, कागदोपत्रात अफरा-तफर करणे, वेळेत कागदपत्रांची पूर्तता न करणे यामुळे सदर वाहनांवर कारवाई केली आहे. या वाहन धारकांना सध्या आरटीओ कार्यालयाकडून नोटीस बजावण्यात येत आहे. वाहन धारकांनी नोटीसकडे दुर्लक्ष करुन शासनाचा महसूल किंवा कागद पत्रे वेळेत सादर न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर संबंधीत वाहनांचा लिलाव करण्यात येणार असल्याचे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने सांगीतले. जीप, बस, स्कूल बस, ट्रक, पिकअप, दुचाकी व अवजड अशी 54 वाहने यावर्षी आरटीओने जप्ती केली. या वाहनांचा लिलावात जो पैसा मिळेल तो शासनाकडे जमा केला जातो. याबाबत हालचाल सुरू झाली असून वाहन धारकांनी महसूल जमा करुन आपले वाहन सोडवून नेण्याबाबत आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment