Saturday 16 June 2012

अर्थपूर्ण मोर्चेबांधणी?

अर्थपूर्ण मोर्चेबांधणी?: - शिक्षण मंडळ शासकीय सदस्य निवडीसाठी

पिंपरी । दि. २७ (प्रतिनिधी)

पिंपरी-चिचंवड महापालिका शिक्षण मंडळावर लोकनियुक्त सदस्य निवड झाल्यानंतर आता मुख्यमंत्री व उपमुयमंत्री नियुक्त दोन सदस्यांसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. वशिल्याबरोबरच अर्थपूर्ण तयारीही काही कार्यकर्त्यांनी दर्शविली आहे. आपलीच वर्णी लागावी, यासाठी नेत्यांकडे साकडे घातले आहे.

शिक्षण मंडळात एकूण १३ जागा असून, त्यात दहा जागा लोकनियुक्त, दोन जागा शासननियुक्त, एक शिक्षणाधिकारी यांचा समावेश आहे. महापालिका सभागृहातून नियुक्त होणार्‍या सदस्यपदाच्या एकूण दहा जागांसाठी नुकतीच निवडणूक झाली. पक्षीय बलाबलानुसार राष्ट्रवादीचे प्राबल्य असल्याने त्यांना नऊ व काँग्रेसचा एक असे एकुण दहा सदस्य निवडले गेले.

या निवडणुकीत सुरुवातीला राष्ट्रवादीतील दहा सदस्यांना उमेदवारी दिली गेली. त्या वेळी शहरातील बंडखोरांनी बंडाचे निशाण फडकावले होते. सुमारे दहा जणांनी अर्ज भरले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारांची नावे जाहीर केली असतानाही बंडखोरांनी आपले अर्ज भरल्याने पक्ष अडचणीत आला होता. राष्ट्रवादीत बंडाचे निशाण, अशा बातम्या झळकल्याने याप्रकरणी उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले. कोण माघार घेणार? कोणाची उमेदवारी बदलणार? ही उत्सुकता शेवटच्या घटकेपर्यंत कायम होती. निवडणुकीच्या दिवशी राष्ट्रवादीतील उमेदवारी दिलेल्या चार उमेदवारांनी माघार घेतली व पक्षाने बंडखोरांतील काही जणांना उमेदवारी दिली.

माघार घेणारांचा पुढे विचार करू, असे आश्‍वासन नेत्यांनी दिले होते. त्यामुळे पक्षाची अधिकृत उमेदवारी असतानाही माजी नगरसेवक धनंजय काळभोर, कुशाग्र कदम, प्रकाश देवाडीकर, शारदा रसाळ यांनी माघार घेतली आणि त्यांच्या जागी शिरीष जाधव, सविता खुळे, धनंजय भालेकर यांना उमेदवारी दिली. तर एक जागा काँग्रेसला सोडण्यात आली.

स्थानिक नेतृत्व व दादांचा शब्द पाळून माघार घेतली, अशाच कार्यकर्त्याचा शासन नियुक्त सदस्यांचा विचार केला जाईल, असे बोलले जाते. आपल्याच नावाची वर्णी लागावी यासाठी इच्छुकांनी थेट दादांना साकडे घातले आहे. काँग्रेसच्या वतीने माजी नगरसेवक अमर मूलचंदानी, महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा नगरसेविका जयश्री गावडे यांचे पती पवना सहकारी बँकेचे संचालक वसंत गावडे, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य रवी खन्ना यांच्या नावाची चर्चा आहे. तर शिक्षण मंडळासाठी अर्ज भरणार्‍या आणि पक्षासाठी माघार घेणार्‍या काँग्रेसचे नारायण लांडगे, संग्राम तावडे यांचाही विचार होऊ शकतो. शहर काँग्रेस समितीकडून कोणती नावे जातात, यावरूनच नाव निश्‍चित होणार आहे.

No comments:

Post a Comment