Sunday 3 June 2012

पीएमपीचा प्रवास ठरतोय प्रवाशांना शिक्षा

पीएमपीचा प्रवास ठरतोय प्रवाशांना शिक्षा: पिंपरी। दि. २६ (प्रतिनिधी)

प्रवाशांच्या सेवेसाठी असलेली पीएमपी सुविधा त्यांनाच आता शिक्षा वाटू लागली आहे. गर्दीच्या मार्गावर पुरविलेल्या बसची संख्या कमी ठरत आहे. त्यामुळे धक्के खातच प्रवास करायचा. त्यातही चालक, वाहक सौजन्याने बोलतील, तर आश्‍चर्यच! सर्वांत महत्त्वाचे म्हणजे बसमधील गर्दीतून वाट काढत तुम्ही इच्छितस्थळी उतरूशकाल, याचीही खात्री नाही. सार्वजनिक वाहतक व्यवस्थेचा अवलंब करा, असा होरा प्रशासनाकडून लावला जात असला, तरी कारभारात सुधारणा करण्याबाबत उदासीनता असल्याने प्रवाशांची निराशाच होत आहे.

काही दिवसांपासून उन्हाची धग वाढू लागली आहे. त्याचा सर्वाधिक त्रास पीएमपी प्रवाशांना सहन करावा लागत आहे. सुरक्षित आणि किफायतशीर सेवा अशी विश्‍वासार्हता पीएमपीने प्रवाशांत निर्माण केली आहे. उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असली, तरी ते बसच्या प्रतीक्षेत थांबून राहतात. पीएमपी प्रशासनाला प्रवासी भाड्याच्या माध्यमातून महसूल देऊनही त्यांची बसशेडची माफक अपेक्षा पूर्ण करण्यातही प्रशासनाला अपयश आले आहे. त्यामुळे शहरातील ६ लाखांहून अधिक प्रवाशांना उन्हातच थांबावे लागत आहे. याबाबत पाठपुरावा करण्यात लोकप्रतिनिधींनाही फारसे स्वारस्य नसल्याचेच दिसत आहे.

दापोडी-निगडी मार्गावर दापोडी, बोपोडी, नाशिक फाटा, पिंपरी, मोरवाडी, प्रीमियर, चिंचवड स्टेशन, काळभोरनगर या थांब्यांवर अद्याप शेड नाही. कासारवाडी, आकुर्डीत शेड आहेत. परंतु प्रवाशांपेक्षा जाहिरातींची सोय पाहिल्याने तेथे केवळ ४ ते ५ प्रवासी थांबू शकतात. त्यामुळे त्यांचाही फारसा उपयोग नाही. मुले, वृद्ध, महिला कितीतरी वेळ बसची वाट पाहात ताटकळत थांबतात. बसमध्येही जागा मिळाली नाही, तर उभ्यानेच प्रवास करावा लागतो. कात्रज, माळवाडी, हडपसर या मार्गांवर बसची संख्या अपुरी आहे. प्रत्येक थांब्यावर बसमधील गर्दी वाढत जाते. त्यामुळे प्रवाशांना इच्छित ठिकाणी उतरणेही कठीण होते. अनेकदा प्रवाशांना पुढच्या थांब्यावर उतरून पुन्हा माघारी यावे लागते. प्रवासासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची मदत घ्यायची की नाही, असा प्रश्न प्रवासी उपस्थित करू लागले आहेत.

No comments:

Post a Comment