Thursday 30 August 2012

गणेशोत्सव मंडळे आता फेसबुकवर!

गणेशोत्सव मंडळे आता फेसबुकवर!: पिंपरी । दि. २८ (प्रतिनिधी)

फेसबुकवर अनेक जण आपली माहिती, वाढदिवस व कार्यक्रम, तसेच फोटो सतत अपलोड करीत असतात. यात आता पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यभरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळेही उतरली आहेत. आपल्या श्री गणेशाची मूर्ती, मंदिरासह मंडळाच्या विविध उपक्रमांच्या माहितीचा यात समावेश असून, या माध्यमातून राज्यभरातील मंडळे प्रथमच इतक्या मोठय़ा संख्येने एकत्र येत आहेत.

कलाकार, नेते मंडळी, मोठमोठय़ा कंपन्या, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुणाई फेसबुक व ट्विटरवर सतत संपर्कात असते. मिनिटागणिक अधिकाधिक माहिती व छायाचित्रे लोड करण्यावर भर दिला जातो. संपर्काच्या या अतिवेगवान साधनाची भुरळ मंडळांनाही पडली आहे.

मंडळाच्या नावानेच अकाउंट सुरू केली आहेत. वॉलपेपरवर ‘श्रीं’ची मूर्ती किंवा मंदिर लक्ष वेधून घेते. तसेच राज्य व देशभरातील श्रींच्या मूर्ती व मंदिरांची छायाचित्रे, रांगोळी, श्लोक, सुविचार, पूजा पद्धती, मंडळाचा अहवाल आदी माहिती दिली गेली आहे.

मंडळास मिळालेली पारितोषिके, मंडळाच्या सदस्यांना मिळालेल्या बक्षीस व पुरस्कारांची माहितीही उपलब्ध आहे. कार्यकारिणी, सादर केलेले देखावे, मंडळातर्फे राबविण्यात आलेले उपक्रम व कार्यक्रम यांची सविस्तर माहिती दिली आहे.

मंडळासोबतच ढोल-ताशा पथकेही या स्पर्धेत उतरली आहेत. सराव, ढोल-ताशाचे प्रकार, वाद्य वाजविताना घ्यावयाची दक्षता, योग्य गणवेश, मिरवणुकीत घ्यावयाचा आहार आदी अत्यावश्यक माहितीची देवाण-घेवाण या माध्यमातून केली जात आहे. या संपर्क माध्यमातून राज्यभरातील मंडळे एकत्रित येत आहेत. ती केवळ गणेशोत्सवातच कार्यरत न राहता आता कायम संपर्कात राहण्यास पसंती देत आहेत. कायदय़ाविषयी लढा उभारणे किंवा जनमत तयार करण्यासाठी ही एकी भविष्यात लाभकारक ठरणार आहे.

No comments:

Post a Comment