Saturday 1 September 2012

बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग

बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग: पुणे-मुंबई-अहमदाबाद प्रकल्पाचा प्रस्ताव तयार
मुंबई। दि. ३१ (प्रतिनिधी)

पुणे - मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाने आता वेग घेतला असून, याचा प्रस्तावही रेल्वे मंत्रालय तयार करीत आहे. यासाठी सल्लागार समितीने रेल्वे मंत्रालयाला अहवाल सादर केल्याचे रेल्वे मंत्रालयाचे प्रवक्ता अनिल सक्सेना यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

पुणे-मुंबई-अहमदाबाद हे ६५0 किलोमीटरचे अंतर असून, या मार्गावर पहिली बुलेट ट्रेन प्रस्तावित केली आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील समितीने या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविला आहे. ही ट्रेन ३00 किलोमीटर प्रतितास वेगाने धावणार असून, आठ तासांचा प्रवास सव्वादोन तासांत पूर्ण होणार आहे.

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविल्यानंतर या प्रकल्पाचे काम पाहण्यासाठी सल्लागार म्हणून तीन कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात सेस्ट्रा ही फ्रान्सची कंपनी, इटलफीयर ही इटलीची कंपनी आणि राईट इंडिया लिमिटेड या रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाराखाली येणार्‍या कंपनीचा समावेश आहे. या तीन कंपन्यांकडून अहवाल तयार करून तो रेल्वे मंत्रालयाला सादर करण्यात आला असल्याचे रेल्वे मंत्रालयाचे प्रवक्ता सक्सेना यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment