Tuesday 18 December 2012

माजी महापौरांच्या वार्डातील इकोमॅन यंत्रच गायब !

माजी महापौरांच्या वार्डातील इकोमॅन यंत्रच गायब !
पिंपरी, 17 डिसेंबर
माजी महापौर योगेश बहल आणि तत्कालीन वैद्यकीय संचालक डॉ. राजशेखर अय्यर यांनी शिफारस केलेली फूड वेस्टपासून खतनिर्मिती करणा-या 'इकोमॅन' लघुसंयत्रांचा घोटाळा समोर आला आहे. योगेश बहल यांच्या प्रभागात बसविलेले हे यंत्र गायब झाले असून माजी महापौर मंगला कदम यांच्या प्रभागात बसविलेले यंत्र अक्षरश: धूळ खात पडले आहे. ही दोन लघुसंयत्रे महापालिकेने 20 लाख रुपयात खरेदी केली होती. या यंत्रावर करण्यात आलेला खर्च संबधितांकडून वसूल करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
शिवसेना नगरसेविका सीमा सावळे यांनी याबाबतची कागदपत्रे आयुक्त डॉ.श्रीकर परदेशी यांना सादर केली. याबाबत पत्रकारांना माहिती देताना सीमा सावळे म्हणाल्या की, शहरातील कचरा विघटनाचा प्रश्न सोडविण्यासाठी पिंपरी महापालिकेने गृहप्रकल्पांना प्रायोगिक तत्वावर ओल्या कच-यापासून कंपोस्ट खत निर्मितीसाठी दोन 'इकोमॅन' लघुसंयंत्रे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.
त्यासाठी तत्कालीन महापौर योगेश बहल आणि सेवानिवृत्त वैद्यकीय संचालक डॉ. राजशेखर अय्यर यांनी लेखी शिफारस केली. आपल्या बंगल्यामध्ये याच स्वरुपाची लघुसंयत्रे असून ती कार्यक्षम आणि प्रभावी आहेत, असे लेखी पत्रही या दोघांनी कंत्राटराला दिले. बहल - अय्यर यांच्या लेखी पत्राचा आधार घेत महापालिकेने 30 कुटुंब संख्येकरिता 30 किलो विघटन क्षमतेचे 8 लाख 50 हजार रुपये किमतीचे आणि 50 कुटुंबांसाठी 50 किलो क्षमतेचे सुमारे 12 लाख रुपये किमतीचे दोन 'इकोमॅन' खरेदी केले.
महापालिकेने स्वखर्चाने खरेदी केलेल्या दोन 'इकोमॅन' यंत्रांपैकी एक यंत्र माजी महापौर योगेश बहल यांच्या प्रभागातील सुखवाणी कॅम्पसमधील वॉटरलीली कॉ-ऑपरेटीव्ह सोसायटीत (वल्लभनगर) आणि दुसरे यंत्र माजी महापौर मंगला कदम यांच्या प्रभागातील साईमंगल सहकारी गृहरचना संस्थेत (संभाजीनगर) बसविण्यात आले.
प्रायोगिक तत्त्वावरील या 'इकोमॅन'च्या उपयुक्ततेची माहिती सीमा सावळे यांनी आरोग्य विभागाकडे मागितली. मात्र, याविषयाची फाईलच सापडत नसल्याने आरोग्य विभागाने उत्तर देण्याकामी तब्बल दोन महिन्यांचा कालावधी घेतला. या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यावर ती फाईल सीमा सावळे यांना देण्यात आली. संभाजीनगरमध्ये बसवलेले 'इकोमॅन' बसविल्यापासूनच बंद अवस्थेत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. तर वल्लभनगरमधील 'इकोमॅन' जागेवरच नसल्याचे आढळून आले. याबाबत रहिवाशांकडे विचारणा केली असता, याबाबत कोणतीच माहिती नसल्याचे या रहिवाशांनी सांगितले.
अखेरीस, 20 लाख रुपयांच्या इकोमॅनबाबत सीमा सावळे यांनी आरोग्य विभागाला जाब विचारला. आरोग्य विभागाची जबाबदारी केवळ यंत्र खरेदी करण्यापुरती मर्यादित आहे. यापुढील नियंत्रण आणि कामकाज पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे असल्याचे सांगण्यात आले. तथापि, पर्यावरण अभियांत्रिकी कक्षाचे प्रमुख संजय कुलकर्णी यांनी याबाबत कानावर हात ठेवले.
आरोग्य विभागाने याबाबतची कोणतीच माहिती आपणास दिली नसल्याचा दावाही त्यांनी केला. 12 लाखांचे यंत्र गायब असल्याची गंभीर बाब निदर्शनास आणूनही दोन्ही विभागांनी त्याकडे दुर्लक्ष केले. सहआयुक्त अमृत सावंत यांच्याकडेही तक्रार करुनही त्यांनी कर्तव्यात कसूर केली असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

माजी महापौर योगेश बहल यांच्या शिफारसीनुसार 'इकोमॅन' खरेदी करण्यात आले. कोणतेच निकष निश्चित न करता त्यांच्या आणि मंगला कदम यांच्या प्रभागात ते बसविण्यात आले. स्थायी समितीच्या मान्यतेनंतर तत्काळ ही यंत्रे खरेदी करण्यात आली. अवघ्या दोनच दिवसात कंत्राटदाराला 20 लाख 39 हजार 700 रुपयांचे बिल महापालिकेच्या 'कर्तव्यदक्ष' अधिका-यांनी अदा केले. मात्र, यानंतरची कार्यवाही करण्याकामी महापालिकेचे सर्वच अधिकारी कुचकामी ठरले. संबधित अधिका-यांना निलंबित करावे, त्यांच्याकडून पैशांची वसूली करावी. तसेच, वल्लभनगर येथील यंत्र चोरीप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सीमा सावळे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

No comments:

Post a Comment