Sunday 2 December 2012

दिल्लीच्या कार्यक्रमासाठी महापालिकेची 'स्पॉन्सरशीप'

दिल्लीच्या कार्यक्रमासाठी महापालिकेची 'स्पॉन्सरशीप'
पिंपरी, 1 डिसेंबर
दिल्ली येथे इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन ट्रान्सपोर्ट यांच्या वतीने भरविल्या जाणा-या 'अर्बन मोबिलीटी इंडिया' या परिषदेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने मुख्य प्रायोजकत्व (स्पॉन्सरशीप) स्विकारले आहे. त्यासाठी महापालिका सात लाख रुपये मोजणार असून आज (शनिवारी) झालेल्या स्थायी समितीच्या सभेमध्ये या खर्चाला मंजुरी देण्यात आली.

अध्यक्षस्थानी जगदीश शेट्टी होते. इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन ट्रान्सपोर्ट यांच्या वतीने नवी दिल्ली येथे 5 ते 8 डिसेंबर या कालावधीत 'अर्बन मोबिलीटी इंडिया' या विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात शहरी वाहतुकीबाबतचे प्रदर्शन आणि परिसंवाद होणार आहे.

महापालिका जेएनएनयुआरएम अंतर्गत शहरात अर्बन ट्रान्सपोर्टबाबत प्रकल्प राबवित आहे. त्यामुळे महापालिकेने या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजकत्व स्विकारले आहे. त्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन ट्रान्सपोर्ट यांना सात लाख रुपयांचा खर्च अदा करण्याच्या आयत्यावेळच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
याखेरीज महापालिकेच्या वतीने येत्या जानेवारी महिन्यात पिंपरीतील एच.ए. मैदानावर पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी येणा-या पन्नास लाखाच्या खर्चासह विविध विकास कामांसाठी सुमारे 26 कोटी 31 लाखाच्या खर्चाला स्थायी समितीने मान्यता दिली. बस खरेदीसाठी पाच कोटी 16 लाख 37 हजार रूपये महापालिकेने उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी पुणे महानगर परिवहन महामंळाने (पीएमपीएमएल) केली होती. त्यासही मंजुरी देण्यात आली. भोसरीतील सर्व्हे क्रमांक एकमधील महापालिकेच्या ताब्यात आलेले आरक्षण विकसित करण्यासाठी येणा-या सुमारे तीन कोटी रूपयांच्या खर्चाचाही त्यात समावेश आहे.
बालवाडीताईंच्या मानधनात वाढ

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नियंत्रणाखाली 221 बालवाडीताई आणि समन्वयक कार्यरत आहेत. वाढत्या महागाईमुळे मानधनात वाढ करण्याची मागणी त्यांच्याकडून सातत्याने होत होती. अखेर आजच्या स्थायी समितीच्या सभेमध्ये बालवाडीताईंच्या मानधनात दरमहा पाचशे तर समन्वयकांच्या मानधनात एक हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

No comments:

Post a Comment