Sunday 2 December 2012

चिंचवडच्या जुईली पटवर्धनचे जागतिक योग स्पर्धेत यश

चिंचवडच्या जुईली पटवर्धनचे जागतिक योग स्पर्धेत यश
पिंपरी, 1 डिसेंबर
इंटरनॅशनल योगा फेडरेशनने आयोजित केलेल्या 24 व्या वर्ल्ड योगा चॅम्पियनशिप स्पर्धेत चिंचवड येथील जुईली सचिन पटवर्धन या अवघ्या 13 वर्षाच्या चिमुरडीने एक सुवर्ण व चार रौप्यपदकके पटकावीत नेत्रदीपक यश मिळविले आहे. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या स्पर्धकांना पराभूत करत तिने हे यश संपादन केलं आहे.

इंटरनॅशनल योगा फेडरेशनतर्फे आयोजित करण्यात आलेली 24 वी वर्ल्ड योगा चॅम्पियनशिप 2012 ही स्पर्धा 23 व 24 नोव्हेंबरला रशियाची राजधानी मॉस्को येथे पार पडली. ही स्पर्धा केवळ दोन गटात घेतली जाते. 17 वर्षावरील व 17 वर्षाखालील गटात ही स्पर्धा घेतली गेली. या स्पर्धेत रशिया, इराण, इराक, बल्जेरीया, चायना, हाँगकाँग आदी देशांच्या योगपटुंनी सहभाग घेतला होता. भारतातून या स्पर्धेत 32 जणांच्या संघात चिंचवड येथील 13 वर्षाची चिमुरडीही होती. ही स्पर्धा एकूण पाच विभागात होते. आणि या पाचही विभागात जुईलीने नेत्रदीपक यश संपादन केलं आहे. रिदमीक योगा स्पर्धेत सुवर्ण, डान्स योगा, आर्टीस्टीक योगा, योगासन स्पर्धा व अथलेटीक्स योगा या विभागात तिने रौप्यपदकाची कमाई केली आहे.

जुईलीला देशासाठी काही तरी मिळवायचे होते. हे तिने अवघ्या 13 व्या वर्षीच करून दाखवले. तिचे यश इतरांना प्रेरणादायी आहे. ही पदके तिने आजी, आई-वडील व सर्व कुटुंबीयांना अर्पण केली.

जुईलीचे वडील सचिन पटवर्धन हे पिंपरी-चिंचवडमधील प्रख्यात वकील आहेत तर आई अश्विनी गृहिणी आहे. जुईली ही ग्लोबल इंटरनॅशनल स्कुल या शाळेची इयत्ता सातवीतील विद्यार्थीनी आहे. योगाकडे लक्ष देतांना तिने शालेय परीक्षांमध्येही घवघवीत यश संपादन केले आहे. जुईली वयाच्या आठव्या वर्षापासून योगा शिकत आहे. सुरवातीला तिच्या प्रशिक्षिका मनाली घारपुरे-देव यांनी फिटनेसकडे लक्ष दिले मात्र तिची वेगात होत असलेली प्रगती पाहुन त्यांनी तिला राष्ट्रीय स्पर्धांसाठी तयार करण्यास सुरवात केली.

त्यानंतर तिने अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेत यशही मिळवले. या स्पर्धेसाठी तिने दिवाळी व परीक्षांच्या काळातही योगासाठी वेळ काढून पूर्वतयारी करत संपादन केले आहे. या स्पर्धेसाठी हरियाणातील पंचकुला येथे सर्व स्पर्धकांना मार्गदर्शनही करण्यात आले. त्यानंतर 21 नोव्हेंबरला सर्वजण मॉस्कोला रवाना झाले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची ही तिची पहिलीच वेळ असली तरी आलेल्या दडपणावर मात करत तिने जिद्दीने घवघवीत यश संपादन केले आहे.

रशियातील स्पर्धेला पदकांची लयलूट करून जुईली नुकतीच चिंचवडला परत आली. त्यावेळी चिंचवड येथील घरी तिचं जल्लोषात स्वागत करण्यात आले. चिमुरड्या जुईलीने भारत देशाबरोबरच पिंपरी-चिंचवड शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.



No comments:

Post a Comment