Tuesday 4 December 2012

अधिवेशन चालू देणार नाही : खडसे

अधिवेशन चालू देणार नाही : खडसे: पिंपरी । दि. २ (प्रतिनिधी)

सिंचनाबाबत श्‍वेतपत्रिका काढून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठीशी घालण्याचे काम सरकार करीत आहे. श्‍वेतपत्रिकेला उत्तर देण्यासाठी हिवाळी अधिवेशनात ब्लॅकपत्रिका काढली जाणार असून, अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी आज दिला.

खान्देशवासीयांच्या रावेत येथील मेळाव्यात खडसे बोलत होते. शहरातील कार्यक्रमांत आज राष्ट्रवादी व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी परस्परांवर सिंचन श्‍वेतपत्रिकेवरून टीका केली.

चिंचवड येथे दुपारी झालेल्या राष्ट्रवादीच्या ग्राहक संरक्षण समिती मेळाव्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी श्‍वेतपत्रिकेवर भाष्य केले. ‘आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून होत आहे. सिंचनाबाबत निघालेली श्‍वेतपत्रिका मिळाली. त्यात आम्ही किती

चांगले काम करतो, हे दिसून आले आहे. येत्या अधिवेशनात विरोधकांना जशास तसे उत्तर देऊ,’ असे पिचड म्हणाले. सायंकाळी झालेल्या खान्देशवासीयांच्या मेळाव्यात श्‍वेतपत्रिकेवरून अधिवेशन चालू न देण्याचा इशारा खडसे यांनी दिला. ते म्हणाले, ‘‘सिंचन श्‍वेतपत्रिका अपूर्ण आहे. सिंचनावर खर्च किती झाला, कोणती कामे केली, क्षेत्र कसे वाढविले याचा आढावा सिंचन श्‍वेतपत्रिकेत घेतला आहे. योग्य माहिती मिळालेली नाही. मात्र, कोणी चुकीची टेंडर दिली. टेंडर का वाढविले, खरेच क्षेत्र वाढले का, याची माहिती देणे अपेक्षित होते. मात्र, पवारांना क्लीन चिट देण्यासाठी श्‍वेतपत्रिका काढल्याचे दिसून येते. पवार, तटकरे यांना हे सरकार व मुख्यमंत्री पाठीशी घालत आहे. सिंचन गैरव्यवहार दडपण्याचा हा प्रयत्न आहे. याचा निषेध आम्ही नागपूरच्या अधिवेशनात करणार आहोत. काळीपत्रिका काढणार असून एसआयटीमार्फत याची चौकशीची मागणी करणार आहोत. सरकारने समाधानकारक उत्तर न दिल्यास अधिवेशन चालू दिले जाणार नाही.’’

१२ डिसेंबरला घोषणा करण्याची पद्धत आहे. गेल्या काही वर्षांत भारनियमनमुक्त महाराष्ट्राचे आश्‍वासन दर वर्षी दिले जाते. यंदा १२-१२-१२ चा मुहूर्त आहे. त्या वेळीही हेच आश्‍वासन दिले जाईल. ते कधी पूर्ण होणार? पाळता येत नसतील तर आश्‍वासने देऊ नका.

- एकनाथ खडसे, विरोधी पक्षनेते, विधानसभा

No comments:

Post a Comment