Tuesday 4 December 2012

उद्योगनगरी जपतेय आयुर्वेदाचा वारसा

उद्योगनगरी जपतेय आयुर्वेदाचा वारसा: अविनाश आदक। दि. ३ (इंद्रायणीनगर)

भोसरी एमआयडीसीमधील जे ब्लॉकमध्ये महानगरपालिका व जनसेवा सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जनसेवा आयुर्वेद वनौषधी उद्यान प्रकल्प अनेक वर्षांपासून संरक्षण व संवर्धन करण्याचे काम करीत आहे.
उद्योग व कंपन्यांच्या गराड्यात दुर्मिळ औषधी जंगलच जणू येथे पहावयास मिळते. लोप पावत चाललेल्या अनेक वनस्पतींचे येथे संवर्धन केले जाते. दमा, संधीवात, हृदयविकार, कर्करोग अशा अनेक दुर्धर आजारांवर दर बुधवारी तज्ज्ञांच्या उपस्थितीत रुग्णांना सल्ला व औषधे दिली जातात.

परिसराची प्रगती जंगल व झाडांच्या र्‍हासालाही कारणीभूत ठरत आहे. अप्रत्यक्षपणे आपण स्वत:च्या पायावर कुर्‍हाडच मारतो आहे. पण, अशातही वनौषधी उद्यान प्रकल्पामुळे दुर्मिळ होऊ पाहत असलेल्या औषधी वनस्पतींच्या संवर्धनाचे सत्कार्य केले जात आहे. बकुळ, चिंच, पारिजातक, अर्जुन, शिवण, अडुळसा, पळस, कोरफड, निवडुंग, हिरडा, बेहडा, वेगवेगळ्या वेली, कंद, मुळे अशा नामशेष होण्याच्या मार्गावर असणार्‍या तब्बल ४८0 औषधी बहुपयोगी वनस्पतींचे एक संग्रहालय येथे उभारण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकमेव औषधी वनस्पती उद्यान अनेक वर्षांपासून भोसरी परिसरात मोठय़ा दिमाखात फुलत असून, नागरिकांना त्याबद्दल पुरेशी माहिती नाही. या उद्यानात आयुर्वेद क्षेत्रातील व डॉक्टरी शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, शिक्षक माहिती घेण्यासाठी येत असतात. काही रुग्णही येथे औषधोपचारासाठी येतात. समाजात वैद्य, हकीम व भोंदू बाबांच्या अंगारा, धुपार्‍यांना बळी पडून आजारपणात आयुष्य कंठणार्‍या लोकांची कमी नाही. अशा लोकांना आर्थिक व मानसिक नुकसानीपासून वाचवण्यासाठी व सर्व आजार दूर करण्याच्या उद्देशानेच हे उद्यान चालू करण्यात आल्याचे उद्यान व्यवस्थापक मनोहर बांगर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment