Sunday 30 December 2012

महिला गटशिक्षणाधिकार्‍यास राष्ट्रवादी नेत्यांची दमदाटी

महिला गटशिक्षणाधिकार्‍यास राष्ट्रवादी नेत्यांची दमदाटी: राजगुरुनगर। दि. २८ (वार्ताहर)

‘आयुष्यभर नोकरी करू देणार नाही, बाबाजी काळे म्हणतात मला.. आठ दिवसांत रडवीन...’ अशी धमकी खेडच्या गटशिक्षणाधिकारी अश्‍विनी सोनवणे यांना आज देण्यात आली. हा प्रताप केलाय तो खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष असलेल्या बाबाजी काळे यांनी. याबाबत जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी व पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. या घटनेचा निषेध म्हणून खेड पंचायत समितीत ‘काम बंद’ आंदोलन करण्यात आले.

महिला गटशिक्षणाधिकार्‍यांस कर्मचार्‍यांसमोर दमदाटीच्या भाषेचा वापर करून दबाव आणण्याची मदरुमकी आज खेड पंचायत समितीत झाली. महिला गटशिक्षणाधिकारी अश्‍विनी सोनवणे या खेड पंचायत समितीच्या शिक्षण विभागात कर्मचार्‍यांना सूचना देत होत्या. त्यावेळी तेथे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष बाबाजी काळे यांचा अचानक संयम सुटला. त्यांनी आवाज चढवून अश्‍विनी सोनवणे यांना दमबाजीस सुरुवात केली. ‘तालुक्यात काम करू देणार नाही. आठ दिवसांत बदलीच करतो. आयुष्यभर नोकरी करू देणार नाही. आठ दिवसांत रडवीन, बाबाजी काळे नाव आहे माझे..’ अशी दमदाटीची भाषा त्यांनी वापरली. अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीने घाबरलेल्या अश्‍विनी सोनवणे यांनी तेथून आपल्या दालनात जाणे पसंत केले. ही दमबाजीची घटना घडत असताना तेथे इतर कर्मचारीही होते. या प्रकाराने पंचायत समितीचे कर्मचारी अवाक झाले. असभ्य व दमदाटीच्या भाषेतील वक्तव्याचा कर्मचार्‍यांनी निषेध करून काम बंद आंदोलन केले.

दरम्यान, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप कंद, जिल्हाशिक्षणाधिकारी दत्तात्रय शेंडकर यांच्याकडे या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर राजगुरुनगर पोलीस ठाण्यात या घटनेसंदर्भात तक्रार देण्यात अली. दरम्यान, खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष बाबाजी काळे यांनी लोकमत प्रतिनिधीस हा प्रकार घडला नसल्याचे भ्रमणध्वनीवरून सांगितले.
यास काय म्हणावे?
दिल्लीतील बलात्काराची दुर्दैवी घटना, ठिकठिकाणच्या विनयभंगाच्या बातम्या, यावरून महिला असुरक्षिततेचा प्रश्न देशभर गाजत आहे. पंतप्रधान मनमोहन सिंगांपासून गृहमंत्री आर. आर. पाटील सार्‍यांनीच महिला असुरक्षिततेच्या मुद्दय़ाला महत्त्व दिले आहे. ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आर. आर. पाटील गृहमंत्री आहेत, त्याच पक्षाचे तालुका उपाध्यक्ष महिला अधिकार्‍यांना जाहीरपणे दमाची भाषा वापरत असतील तर यास काय म्हणावे? खेड तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते-पाटील, तालुकाध्यक्ष म्हणून शांताराम भोसले या घटनेची दखल घेणार का? महिला अधिकार्‍यास अपमानस्पद शब्द व धमकी कोणत्या राजकीय पक्षाच्या घटनेत बसते, अशी संतप्त प्रतिक्रिया कर्मचारी व नागरिकांनी व्यक्त केली.

बाबाजी काळे यांची भाषा, चढवलेला आवाज, त्यांची बोलण्याची पद्धत अत्यंत चुकीची होती. एक प्रकारची मुजोरी होती. एखाद्या महिला अधिकार्‍याशी कसे बोलावे याचे भान त्यांना उरले नव्हते. अतिशय अपमानास्पद शब्द वापरून त्यांनी जो दम दिला ते अत्यंत दुर्दैवी होते. सभ्यतेची सीमारेषा त्यांनी ओलांडली. त्यामुळे नाइलाजास्तव मला वरिष्ठांना कळवून पोलिसांकडे तक्रार द्यावी लागली. यापूर्वीसुद्धा आमच्या शिक्षकाला काळे यांनी मारहाण केली व त्याची पोलिसांकडे तक्रार झालेली आहे. महिलांबरोबर बोलताना किमान सभ्यतेचे शब्द पाळायला पाहिजे होते. - अश्‍विनी सोनवणे , गट शिक्षणाधिकारी, खेड पंचायत समिती

No comments:

Post a Comment