Sunday 9 December 2012

मेट्रो दूर; मात्र खर्च सव्वीसशे कोटींनी वाढला

मेट्रो दूर; मात्र खर्च सव्वीसशे कोटींनी वाढला:
M_Id_148695_Metro
पुण्याचा मेट्रो प्रकल्प केव्हा सुरू होईल आणि मेट्रो कधी धावायला लागेल याबाबत पूर्णत: अनिश्चितता असली, तरी मेट्रोच्या दोन प्रस्तावित मार्गाचा खर्च मात्र तब्बल दोन हजार ६३१ कोटींनी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. मेट्रोचा खर्च आता १० हजार ५७७ कोटींवर गेला असून खर्चाचा हा आकडा मेट्रो २०१४ पर्यंत सुरू झाली तरचा आहे. प्रकल्प आणखी लांबल्यास खर्चात आणखी वाढ होईल.
मेट्रोच्या स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या मार्गाच्या आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, निधी उभारणीबाबत निर्णय घेण्यासाठी आणि प्रकल्प राबविण्यासाठी आयुक्तांना सर्वाधिकार द्यावेत, असा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावात मेट्रोच्या खर्चात वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. मेट्रोचा प्रस्तावित खर्च आणि खर्चात झालेली वाढ यातील अंतर भरून काढण्यासाठी आर्थिक उपाययोजना करणे व त्याचे निर्णय घेणे, तसेच मेट्रोसाठी स्वतंत्र कंपनी स्थापन होईपर्यंत कार्यवाही करणे यासाठीही आयुक्तांना अधिकार देण्यासंबंधीचा हा प्रस्ताव आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंवचडमधील संयुक्त मेट्रो प्रकल्प सन २००९ पासून चर्चेत आहे आणि त्यातील वनाझ ते रामवाडी या एकाच मार्गाला आतापर्यंत राज्य शासनाकडून तत्वत: मंजुरी मिळाली आहे. दुसरा मार्ग पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट असा आहे. मेट्रोचा प्रकल्प अहवाल दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने सन २००९ मध्ये तयार केलेला असून वनाझ ते रामवाडी या मार्गासाठी १,९४८ कोटी रुपये खर्च त्यावेळी अपेक्षित होता. हा मार्ग २०१४ पर्यंत पूर्ण झाल्यास या मार्गासाठी २,५९३ कोटी इतका खर्च येईल, तर स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या मार्गासाठी ५,९९८ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित होता. तो आता ७,९८४ कोटी इतका वाढेल. या दोन्ही मार्गाची एकूण लांबी ३१.५१ किलोमीटर इतकी असून पुणे आणि पिंपरी महापालिकांनी आपापल्या हद्दीतील मार्गाचा खर्च करायचा आहे. एकूण खर्चाच्या प्रत्येकी २० टक्के रक्कम केंद्र व राज्य शासनाकडून मिळणार आहे, तर दहा टक्के रक्कम महापालिकेने द्यायची आहे. उर्वरित ५० टक्के रक्कम कोणत्या माध्यमातून उभी करायची यासंबंधी वेगवेगळे पर्याय समोर आले आहेत. त्यात मुख्यत: पब्लिक प्रायव्हेट पार्टिसिपेशन (पीपीपी) किंवा खासगीकरण किंवा बीओटी आदी पर्यायांची चर्चा आहे.
 सहा भुयारी स्थानके
स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड हा मार्ग १६.५१९ किलोमीटर इतक्या लांबीचा असून वनाझ ते रामवाडी हा मार्ग १५ किलोमीटर लांबीचा आहे. त्यातील स्वारगेट ते िपपरी या मार्गात १५ स्थानके आहेत. त्यातील सहा स्थानके पिंपरीच्या हद्दीत आहेत आणि ती सर्व उन्नत मार्गावरील (इलेव्हेटेड) आहेत. पुणे महापालिका हद्दीत दोन आणि खडकी कॅन्टोन्मेंट हद्दीत एक इलेव्हेटेड स्थानके असून उर्वरित सहा स्थानके भुयारी आहेत आणि ती पुणे महापालिका हद्दीतील आहेत. यातील पिंपरी महापालिका हद्दीत पूल, उड्डणपूल, ग्रेड सेपरेटर यांची संख्या अधिक असल्याने तेथील तांत्रिक बदलांसाठी अधिक खर्च येणार असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.   

No comments:

Post a Comment