Saturday 16 February 2013

आयुक्तांचा ‘धाक’, ४६ स्वेच्छानिवृत्त

आयुक्तांचा ‘धाक’, ४६ स्वेच्छानिवृत्त: पिंपरी । दि. १५ (प्रतिनिधी)

महापालिकेतील ५ अधिकारी व ४१ कर्मचारी गेल्या ९ महिन्यांत स्वेच्छानिवृत्त झाले आहेत. आयुक्त श्रीकर परदेशी यांनी कामकाजात आणलेली शिस्त या सार्‍यांना जाचक वाटल्याची चर्चा आहे. तसेच चौकशीचे कोणतेही लचांड मागे लागण्यापूर्वी नवृत्त झालेले बरे अशी भावनाही त्यामागे असल्याचे बोलले जाते. यातून नवृत्तीच्या उंबरठय़ावर असलेले अनेकजण तर एकेक दिवस मोजत आहेत.

आपल्या कार्यपद्धतीने आयुक्तांनी शहरातील नागरिकांचे लक्ष वेधले आहे. परंतू, राजकीय पुढार्‍यांसह अनधिकृत बांधकाम धारकांनी त्यांचा धसका घेतला आहे. त्यातच प्रशासकीय कामात आणलेल्या शिस्तीने कामचुकारांची भंबेरी उडाली आहे. वर्षानुवर्षे ठाण मांडून असलेले अधिकारी हैराण झाले आहेत.

२३ मे २0१२ ला परदेशी रुजू झाले. तेव्हापासून आतापर्यंत तब्बल ४६ जणांनी स्वेच्छानवृत्ती घेतली आहे. त्यांमध्ये कार्यकारी अभियंता, उपअभियंता, लेखाधिकारी, लिपिक, परिचारिका, मीटर निरीक्षक, मजूर आणि सफाई कामगारांचा समावेश आहे. नवृत्तीसाठी एक वर्षाचा अवधी असतानाही स्वेच्छानवृती घेणार्‍यांचा त्यामध्ये समावेश आहे.

कामकाजात सुसूत्रतेसाठी आयुक्तांनी दहा कलमी कार्यक्रम हाती घेतला आहे. रुजू होताच पहिल्या टप्प्यात वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठिय्या मारणार्‍यांच्या बदल्या केल्या. नंतर आढावा बैठका, अचानक तपासणी अशी मोहीम राबविल्याने कामचुकार अधिकारी, कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले. त्यातील अनेकांनी महापालिकेला रामराम ठोकला. ज्यांना या कार्यपद्धतीत काम करणे शक्य नाही त्यांनी स्वेच्छा नवृत्तीचा पर्याय अवलंबला आहे.

आर्थिक मंदी अथवा अन्य कारणांमुळे खासगी क्षेत्रातील कामगार स्वेच्छा नवृत्ती घेतात, हे सर्वश्रुत आहे. पण महापालिकेची सुखाची नोकरी असताना स्वेच्छा नवृती घेणार्‍यांचे प्रमाण अचानक वाढल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment