Monday 20 May 2013

चिखलीत सिलिंडर स्फोटाने एक जखमी

चिखलीत सिलिंडर स्फोटाने एक जखमी: चिखली : नादुरुस्त सिलिंडरची दुरुस्ती करतेवेळी अचानक भडका उडून त्याचा स्फोट झाला. सिलिंडरचा काही भाग पायावर आदळून एकजण गंभीर जखमी झाला आहे. चिखलीतील मोरेवस्तीमध्ये रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडला. अचानक झालेल्या या स्फोटामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली. तर सिलिंडर दुरुस्तीसाठी आणणारे दोघेजण या स्फोटानंतर पसार झाले.

सफी अन्सारी (४0, रा. मोरेवस्ती, चिखली) असे या घटनेत जखमी झालेल्याचे नाव आहे. त्यांच्या डाव्या पायाचे हाड मोडले असून संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात ते उपचार घेत आहेत. मोरेवस्तीमध्ये भैरवी मेटल्स अँन्ड इलेक्ट्रीकल्स नावाचे दुकान आहे. सायंकाळी सव्वासातच्या सुमारास दोघेजण तेथे अडीच किलो वजनाचे सिलिंडर दुरुस्तीसाठी घेऊन आले. व्यावसायिकाने ते बाहेरच ठेवण्यास सांगितले. तेथे जाऊन तो त्यातील दोष शोधू लागला. परंतु, त्याचवेळी सिलिंडरचा भडका उडाला. चहूबाजूनी पेटलेले सिलिंडर विझविण्याचा प्रयत्न व्यावसायिक आणि अन्य नागरिक करू लागले. परंतु त्याचक्षणी त्याचा स्फोट झाला. दोन तुकडे झाले. बाजूलाच खरेदीसाठी आलेल्या सफी यांच्या पायावर एक तुकडा जोराने लागला. त्यामुळे गुडघ्याखाली त्यांच्या
पायाचे हाड मोडले आहे. नागरिकांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. तर
दुसरा तुकडा इलेक्ट्रीकल्सच्या दुकानावर आदळल्याने शटरला मोठा खड्डा पडला आहे. (वार्ताहर)

No comments:

Post a Comment