Monday 20 May 2013

एलबीटीप्रश्नी राष्ट्रवादीत फूट

एलबीटीप्रश्नी राष्ट्रवादीत फूट: चिंचवड : स्थानिक संस्था कराला (एलबीटी) आता राजकीय वळण आल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत आहे. व्यापार्‍यांनी पुकारलेल्या बेमुदत बंदला पाठिंबा देण्यासाठी तर काही जण विरोध करण्यासाठी आक्रमक झाल्याने एलबीटीचा मुद्दा कळीचा विषय झाला आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाच्या नेतेमंडळींमध्ये एकमत नसल्याने परस्पर विरोधी भाष्य केली जात आहेत. आमदार अण्णा बनसोडे यांनी व्यासपीठावर येऊन व्यापार्‍यांच्या बंदला पाठिंबा दिला.

व्यापारी नागरिकांना वेठीस धरत असल्याचा आरोप शहरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी करीत आहेत. सोमवारपर्यंत दुकाने उघडली नाही, तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जबरदस्तीने दुकाने उघडतील असा इशारा शहराध्यक्ष योगेश बहल यांनी पत्रकार परिषदेतून दिला होता. फेडरेशन ऑफ पिंपरी-चिंचवड ऑफ असोसिएशनचे अध्यक्ष खासदार गजानन बाबर यांनी जशास तसे उत्तर देऊ असा पवित्रा घेतल्याने एलबीटीचा हा विषय प्रतिष्ठेचा ठरत आहे. शहरात व्यापार्‍यांच्या भूमिकेशी पाठिंबा देण्यासाठी मनसे, भाजप, शिवसेना व काँग्रेससह राष्ट्रवादीच्या काही नगरसेवक, पदाधिकार्‍यांनी व्यासपीठावर उपस्थित राहून पाठिंबा जाहीर केला. बहल व बाबर यांच्या अंतर्गत वादामुळे विरोधात बहल चुकीची भूमिका घेत असल्याचे मत व्यापार्‍यांनी व्यक्त केले. तोडगा काढण्यासाठी मी गृहमंत्री आर.आर. पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी आज चर्चा करणार असून, व्यापार्‍यांच्या पाठीशी राहणार असल्याचे आमदार बनसोडे यांनी सांगितले. बहल यांच्या केलेल्या वक्तव्याविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)

No comments:

Post a Comment