Friday 28 March 2014

दादांच्या भीतीने पदाधिकारी हजर

पिंपरी : पक्षविरोधी कारवाया केल्यास गाठ माझ्याशी आहे, असा सज्जड दम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड व मावळमधील राष्ट्रवादीच्या स्थानिक नेते, प्रमुख पदाधिकार्‍यांना भरल्याने दादांना आपण दिसावे, यासाठी अनेक कार्यकर्ते आटापिटा करीत होते. दादांच्या भीतीने प्रमुख नेते महापालिकेत सकाळी हजर झाले होते. ते केवळ नेत्यांस दिसावे यासाठी.
पिंपरी व चिंचवड विधानसभेतील राष्ट्रवादीचे महापालिकेतील प्रमुख पदाधिकारी, संघटनेचे कार्यकर्ते रात्री ‘भाऊं’कडे, तर दिवसा दादांच्या उमेदवाराकडे अशी दुहेरी भूमिका बजावतात. हे माहिती पडल्याने उपमुख्यमंत्र्यांनी तळेगाव दाभाडेतील सभेत चांगलेच सडकावले होते. तसेच कोणालाही माफी करणार नाही, असा सज्जड दम भरला होता. मात्र, जगतापांविषयी कोणतीच प्रतिक्रिया न दिल्याने कार्यकर्त्यांत संभ्रम आहे. त्यामुळे अजूनही भाऊ आणि दादांना न दुखावण्याची कसरत राष्ट्रवादीतील कार्यकर्ते करीत आहेत. सोमवारी जगतापांनी अर्ज दाखल केला. त्या वेळी काही पदाधिकारी प्रत्यक्षपणे, तर काही अप्रत्यक्षपणे काम करीत होते. चिंचवडच्या काही नगरसेवकांनी थेट निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या कार्यालयात भाऊंना शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र, माध्यमांनी छेडल्यानंतर ‘तो मी नव्हेच’ ही भूमिका घेतली होती, तर मावळातील काही पदाधिकारी वाहनतळात गाडीमध्ये थांबले होते. 

No comments:

Post a Comment