Tuesday 3 April 2018

आरोग्य आणि पर्यावरणासाठी ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प गरजेचा – महेश लांडगे

चौफेर न्यूज  –  मोशीतील कचरा डेपोला लागलेली आग दुर्दैवी आहे. सहा वर्षाच्या कालखंडानंतर डेपोला आग लागली आहे. शहरातील कच-याची समस्या उग्र होत आहे. नियोजित ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पामुळे कच-याची समस्या सुटण्यास मोठा हातभार लागणार आहे. नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरणासाठी या प्रकल्पाची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, असे मत भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले. तसेच मोशीतील कचरा डेपोला आग लागू नये यासाठी प्रशासनाने कडक पाऊले उचलावित. तात्पुरत्या आणि कायमस्वरुपाचा तोडागा काढावा, अशा कडक सूचना देखील त्यांनी महापालिका अधिका-यांना दिल्या आहेत. चार दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोला आग लागली होती. त्यापार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे यांनी आज (सोमवारी) आढावा बैठक घेतली. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर, शहर सुधारणा समितीचे सभापती सागर गवळी, क्रीडा समितीचे सभापती लक्ष्मण सस्ते, नगरसेवक अॅड. नितीन लांडगे, नगरसेविका सुवर्णा बुर्डे, सह शहर अभियंता अयुब्बखान पठाण, पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, अग्निशामक अधिकारी किरण गावडे, आरोग्य अधिकारी मनोज लोणकर आदी उपस्थित होते. त्यानंतर आमदार लांडगे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

No comments:

Post a Comment