Wednesday 13 June 2012

हिंजवडी आयटी पार्कमध्ये खंडणीखोरांना अटक

हिंजवडी आयटी पार्कमध्ये खंडणीखोरांना अटक: पिंपरी। दि. २0 (प्रतिनिधी)

हिंजवडीमध्ये कंपन्यांना कर्मचार्‍यांची ने-आण करण्यासाठी गाड्या पुरविणार्‍या व्यावसायिकांना खंडणी मागणार्‍या मुळशीतील ६ गुडांना अटक केली. शनिवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास खंडणीविरोधी पथकाच्या पोलिसांनी त्यांना अटक केली.

अविनाश आनंद वाघुलकर (वय २२, रा. माण ग्रामपंचायत कार्यालयामागे, मुळशी), संतोष बाबुलाल विटकर (वय १९, रा. माण, राक्षेवस्ती, मुळशी), किरण बाबू शेळके (वय २0, रा. माण, राम मंदिरासमोर, मुळशी), संदीप प्रकाश ठाकर (वय २0, रा. माण, माणदेवी मंदिराशेजारी), प्रवीण बापू कसाळे (वय २0, रा. माण, ता. मुळशी), ज्ञानेश्‍वर आनंद वाघुलकर (वय २0, माण, ता. मुळशी) अशी खंडणीखोरांची नावे आहेत. याप्रकरणी सांगवीतील एका व्यावसायिकाने तक्रार दिली होती.

हिंजवडी राजीव गांधी पार्क येथील आयटी कंपन्यांना कर्मचार्‍यांची ने-आण करण्याकरिता गाड्या पुरविण्याचे काम त्या व्यावसायिकाकडून करण्यात येते. त्यांना १२ एप्रिल रोजी एका व्यक्तीने फोन करून ‘हप्ता चालू कर नाहीतर बघून घेईन’ अशी धमकी दिली. त्यानंतर १४ एप्रिलला त्यांच्या बसच्या काचा फोडण्यात आल्या. त्यानंतर त्यांना पुन्हा फोन आला. ‘हप्ता चालू करतोस का, पुन्हा तुझ्या गाड्यांच्या काचा फोडू. हिंजवडी भागातील सर्व व्यावसायिक आम्हाला हप्ता देतात. तुला पण द्यावा लागेल,’ असे त्यांना धमकाविण्यात आले.

हिंजवडीतील डीएलएफ कंपनीच्या मागील बाजूने १६ मे रोजी खंडणीची रक्कम घेऊन येण्यास त्यांना सांगण्यात आले. त्याप्रमाणे मित्रांसह ती रक्कम घेऊन ते गेले होते; मात्र पैसे घेण्यासाठी कोणी आले नाही. त्यानंतर त्यांना फोन करून खंडणीखोरांनी त्यांन पुन्हा धमकाविले.

‘‘तू मित्रांना घेऊन का आला होतास? आता तुझ्या गाड्यांच्या काचा किती बदलाव्या लागतात ते बघ.’’ खंडणीखोरांच्या या त्रासाला कंटाळून अखेर त्यांनी खंडणीविरोधी पथकाकडे याविरोधात तक्रार दिली.

खंडणीखोरांना पैसे घेण्यासाठी बोलविण्यात आले. त्यानुसार शनिवारी रात्री ते पैसे स्वीकारण्यासाठी आले असता त्यांना सापळा रचून अटक करण्यात आली.

या कारवाईमध्ये खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सावतं, सहायक निरीक्षक संतोष सुबाळकर, पोलीस कर्मचारी ऋषिकेश महल्ले, अनिल शिंदे, पांडुरंग वांजळे, गणेश माळी, अनंत दळवी, मारूती भुजबळ, बाळासाहेब जराड, चंद्रकांत इंगळे, नागनाथ गवळी, दिलीप काची, संजय काळोखे यांनी सहभाग घेतला.

संपर्क साधण्याचे आवाहन

हिंजवडी परिसरातील व्यावसायिकांना या टोळीकडून खंडणीसाठी त्रास दिला जात असल्याची शक्यता आहे. तरी कुणा उद्योजक, व्यावसायिक यांच्याकडून या टोळीने खंडणी घेतली असल्यास अथवा मागणी केली असल्यास खंडणी विरोधी पथकाकडे संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

No comments:

Post a Comment