Saturday 1 December 2012

धावडेवस्तीत दुस-या दिवशीही तणावपूर्ण शांतता

धावडेवस्तीत दुस-या दिवशीही तणावपूर्ण शांतता
पिंपरी, 30 नोव्हेंबर
भोसरी येथील धावडेवस्तीत सराईत गोट्या धावडे व अंकुश लाडके यांच्या खुनानंतर परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले. या दुहेरी खुनानंतरच्या दुस-या दिवशीही धावडेवस्तीत तणावपूर्ण शांतता पाहावयास मिळाली. दंगल काबू पथक, सीआरपीएफ या पथकासह पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत.

गोट्या उर्फ सचिन कुंडलीक धावडे (31, रा. धावडेवस्ती, भोसरी) आणि अंकुश रामदास लाडके (27, रा. धावडेवस्ती) या दोघांचा गुरूवारी (दि. 29) दुपारी खून झाला. या हल्ल्यात संदीप रामचंद्र मधुरे (30, रा. आकुर्डी) हा गंभीर जखमी असून, त्याच्यावर भोसरीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

गुरुवारी साडेअकराच्या सुमारास गोट्या, संदीप व त्याचे अन्य दोन मित्र धावडेवस्ती येथील हॉटेल मनीष शेजारी असलेल्या त्याच्या कार्यालयासमोर गप्पा मारत बसले होते. त्यावेळी एका महिंद्रा मॅक्सीको (एम एच 24 जे 8315) या टेम्पोतून तोंडाला माकड टोप्या घातलेले 12 ते 15 जण त्या ठिकाणी आले. हातातील हॉकी स्टिक, दगड याच्यासह तलवार, कोयता या सारख्या धारदार हत्याराने गोटय़ावर हल्ला चढविला. तसेच संदीप यालाही मारहाण करण्यात आली. गोट्याचे दोन साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरले.

या प्रकरणी भोसरी पोलिसांनी राहुल लांडगे, किशोर साखरे आणि अभिषेक जरे या तिघांना शुक्रवारी (दि.29) पहाटे दोनच्या सुमारास पोलिसांनी अटक केली. तिघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

भोसरीतील दुहेरी खुनप्रकरणानंतर धावडेवस्तीत दंगल काबू पथक, सीआरपीएफ तुकडी व पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. गोट्या धावडे व राहुल लांडगे यांच्या घरासमोर पोलिसांचा पहारा तैनात केला आहे. त्यामुळे धावडेवस्तीला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. दुस-या दिवशीही धावडेवस्ती परिसरातील व्यावसायिकांनी व्यवहार बंद ठेवले होते.

No comments:

Post a Comment