Wednesday 16 January 2013

ढेरंगे खुनीहल्लाप्रकरणी आरोपीला 19 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

ढेरंगे खुनीहल्लाप्रकरणी आरोपीला 19 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
पिंपरी, 15 जानेवारी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप ढेरंगे यांच्यावरील प्राणघातक हल्ला प्रकरणी आरोपी विक्रांत माने याला मंगळवारी (दि. 15) पिंपरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 19 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हल्ल्यातील जखमी संदीप ढेरंगे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी ढेरंगे यांच्या पत्नी वैजयंती संदीप ढेरंगे (वय-31, रा. अक्षय अपार्टमेंट, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सोमवारी (दि. 14) दुपारी एकच्या सुमारास विक्रांत माने याने उसनवारीच्या पैशावरून पिंपरीच्या विशाल टॉकीजजवळील कार्यालयात घुसून धारदार शस्त्राने संदीप ढेरंगे यांच्यावर खुनी हल्ला केला. या हल्ल्यात ढेरंगे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर थेरगाव येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोर विक्रांत माने याला पोलिसांनी आळंदी येथून अटक केली.

संदीप ढेरंगे यांच्याकडून विक्रांत माने याने बहिणीच्या लग्नासाठी व रिक्षा सोडविण्यासाठी 50 हजार रूपये घेतले होते. ते पैसे मिळावेत म्हणून ढेरंगे माने याच्याकडे तगादा लावल्याने माने याने खुनी हल्ला केला. त्याला पिंपरी न्यायालयाने 19 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक (गुन्हे) बी. मुदीराज तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment