Wednesday 16 January 2013

स्मशानभूमीसाठी काळजीवाहकांच्या नेमणुकीची 27 संस्थांना 'खिरापत'

स्मशानभूमीसाठी काळजीवाहकांच्या नेमणुकीची 27 संस्थांना 'खिरापत'
पिंपरी, 15 जानेवारी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कानउघडणी केल्यानंतर गेली तीन आठवडे तहकूब करण्यात आलेली स्थायी समितीची सभा आज अखेर पार पडली. सुमारे अकरा कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देतानाच महापालिकेच्या 33 स्मशानभूमींसाठी काळजीवाहक नेमण्याचे काम 27 ठेकेदार संस्थांना देण्याचा निर्णयही घेण्यात आला.

अध्यक्षस्थानी सभापती जगदीश शेट्टी होते. महापालिकेच्या 35 स्मशानभूमीमध्ये काळजी वाहक नेमण्याच्या कामासाठी निविदा प्रसिध्दी करण्यात आली होती. त्यानुसार 28 निविदा प्राप्त झाल्या. त्यातील 27 निविदाधारकांनी आठ तासासाठी प्रती कर्मचारी 309 रुपये दर देण्याची तयारी दाखविली आहे. एका स्मशानभूमीसाठी चार काळजीवाहक या संस्थांमार्फत नेमले जाणार आहेत. 28 पैकी प्राप्त झालेल्या मोरया महिला स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेचा निविदा दर जास्त होता. या व्यतीरिक्त आयुक्तांनी प्रसिध्दीस दिलेल्या जाहीर निवेदनात कोणत्याही सामाजिक संस्था अथवा धर्मादाय संस्था यांनी आयुक्तांनी ठरवून दिलेल्या किमान वेतनदरानुसार काळजी वाहक पुरवून स्मशानभूमींची देखभाल व दुरुस्ती करण्याची तयारी दर्शविल्यास थेट पध्दतीने काम देण्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानुसार चार सामाजिक धर्मादाय संस्थांनी अर्ज दाखल केले आहेत.

पिंपरीनगर येथील स्मशानभूमीकरीता जुलै 2014 पर्यंत करारनामा झाला आहे. तसेच शहरातील 35 पैकी एक स्मशानभूमी खासगी असल्याने तेथे महापालिकेमार्फत काळजीवाहक पुरविता येत नाहीत. त्यामुळे उर्वरीत 33 स्मशानभूमीसाठी काळजीवाहक नेमण्याचे काम देण्याचे निश्चित झाले आहे. 27 संस्थांना 27 स्मशानभूमीमध्ये काळजीवाहक नेमण्याचे काम देवून उर्वरीत सहा स्मशानभूमीसाठी पात्र 27 संस्थांमधून सोडत पध्दतीने काळजीवाहक नेमण्याचे काम दिले जाणार आहे. त्यांच्यासोबत तीन वर्षे कालावधीसाठी हा करारनामा करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली.

महापालिकेमार्फत येत्या 17 व 18 जानेवारीला चोविसतास पाणीपुरवठ्यासंदर्भात नगरसेवक आणि अधिका-यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड येथील ऑटो क्लस्टरच्या सभागृहात ही कार्यशाळा होणार आहे. अ‍ॅडमिनीस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेज ऑफ इंडियाचे (आस्की) संचालक डॉ. वेदाला चारी मार्गदर्शन करणार आहेत. ही कार्यशाळा आयोजित करण्याबरोबरच त्यासाठी येणा-या खर्चाला स्थायी समितीने मान्यता दिली. महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या बारा हजार पैकी चार हजार लाभार्थ्यांना शिवणयंत्रांचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरीत लाभार्थ्यांनाही शिवणयंत्र देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
'ड' प्रभाग कार्यक्षेत्रातील रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी 28 लाख 51 हजार रुपये, च-होलीतील मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी 45 लाख, दत्तवाडीतील रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 39 लाख 78 हजार, फुगेवा़डीतील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी 64 लाख 32 हजार रुपयांच्या खर्चासह सुमारे अकरा कोटी रुपयांच्या विकास कामांना स्थायी समितीने मान्यता दिली. जकात दर 'जैसे थे' ठेवण्याबरोबरच मिळकरामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव तहकूब ठेवण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करुन याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे जगदीश शेट्टी यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment