Friday 11 January 2013

‘पुनर्वसना’तील रहिवासी अंधारात

‘पुनर्वसना’तील रहिवासी अंधारात: चिंचवड । दि. ९ (वार्ताहर)

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत वेताळनगरमधील रहिवाशांचे दळवीनगर परिसरात तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. तेथे ३१२ पत्र्यांची घरे उभारण्यात आली आहे. येथील रहिवाशी ४ दिवसांपासून अंधारात असूनही पालिका प्रशासन व महावितरण कंपनी दुर्लक्ष करीत असल्याने येथील रहिवाशांनी चिंचवडमधील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला.

रविवारी पहाटे ६ वाजेपासून या भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. याबाबत रहिवाशांनी महानगरपानिका प्रशासन व महावितरण कार्यालयाकडे तक्रार केली. परंतु, याबाबत कोणीही दखल घेतली नाही. यामुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी बुधवारी दुपारी ३ ला महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. याप्रसंगी नगरसेवक अनंत कोर्‍हाळे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व रहिवाशी उपस्थित होते.

मोर्चात सहभागी असणार्‍या रहिवाशांनी महावितरण कार्यालयातील अधिकार्‍यांना भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु, दोन मिनिटे थांबा असे सांगत अधिकार्‍यांनी काढता पाय घेतला. दोन तासांहून अधिक वेळ रहिवाशी कार्यालयाबाहेर थांबले होते. परंतु, कोणतेही अधिकारी चर्चेसाठी आले नाही. स्थानिक पोलिसांनी मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांना अरेरावी करून हाकलून दिल्याने नागरिक संतप्त झाले. चार दिवसांपासून येथील नागरिक अंधारात असूनही महावितरण कंपनीने याकडे दुर्लक्ष केल्याने रहिवाशांनी लोकप्रतिनिधींना संपर्क साधला. परंतु, यातून निर्णय न झाल्याने सायंकाळी ६ वाजता रहिवाशी निघून गेले. महावितरण व पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने दाद मागावी कोणाकडे, अशी नागरिकांची मनस्थिती आहे.

रोहीत्र नादुरुस्त : पवार
उद्योगनगर परिसरातील पत्राशेडमध्ये ज्या रोहित्रावरून विद्युतपुरवठा केला जातो तो नादुरुस्त झाला आहे. यामुळे या भागातील वीजपुरवठा बंद आहे. रोहित्राची मागणी केली आहे. परंतु, या भागातील रहिवाशांकडे ८0 टक्के थकबाकी आहे. येथील रहिवाशी विजेची बिले भरत नसल्याने विद्युत जोड देण्यासाठी अडचणी येत आहेत. वरिष्ठांच्या आदेशानुसार थकबाकी वसूल करणे अपरिहार्य आहे. यासाठी मोहीम हाती घेणार असून, रोहित्र बदलण्याचे काम रात्री सुरू करणार आहे.

No comments:

Post a Comment