Tuesday 5 February 2013

गहाणवटीच्या दागिन्याचा अपहार केल्या प्रकरणी सराफाविरुध्द गुन्हा

गहाणवटीच्या दागिन्याचा अपहार केल्या प्रकरणी सराफाविरुध्द गुन्हा
पिंपरी, 4 फेब्रुवारी
घर बांधण्यासाठी सोन्याचे दागिने सराफाकडे गहाण ठेवून कर्ज घेणा-या महिलेला सराफानेच गंडा घातला. गहाण ठेवलेल्या तीन लाख 63 हजार रूपयांच्या सोन्याच्या दागिन्याचा अपहार केल्याचा ठपका सराफावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात सराफाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छाया विजय येडगल्लू (वय-50, रा. सहकार कॉलनी, काळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी योगेश कुलथे (रा. रिव्हर रोड, पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरीतील रिव्हर रस्त्यालगत योगेश कुलथे यांचे 'कुलथे सराफ' नावाचे सराफी दुकान आहे. छाया येडगुल्लू यांनी कुलथे यांच्या दुकानात एक एप्रिल 2012 व 16 सप्टेंबर 2012 रोजी तीन लाख 63 हजार 750 रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने योगेश कुलथे याच्याकडे गहाण ठेवून एक लाख 92 हजार रूपयांचे कर्ज घेतले होते.

गहाण ठेवलेले सोन्याचे दागिने सोडविण्यासाठी येडगुल्लू यांनी योगेश कुलथे यांना 3 जून 2012 रोजी एक लाख 14 हजार रूपये दिले. मात्र, येडगुल्लू यांचे दागिने कुलथे यांने परत केले नाही, असा आरोप येडगल्लू या महिलेने केला आहे. येडगुल्लू यांचे दागिने परत न करता विश्वासघात करून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एल. एन. सोनवणे तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment