Friday 1 March 2013

पुणे मेट्रोसाठी उघडले खाते

पुणे मेट्रोसाठी उघडले खाते: पुणे। दि. २८ (प्रतिनिधी)

दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर केंद्रीय अर्थसंकल्पात पुणे मेट्रो प्रकल्पासाठी खाते उघडले. पुण्यात मेट्रोसारख्या सार्वजनिक उपक्रमासाठी ९ कोटी ९९ लाखांची गुंतवणूक करण्यासाठी निधीची तरतूद केली आहे.  केंद्र व राज्य शासनाच्या अर्थसंकल्पातून पुणे मेट्रोला निधी मिळण्यासाठी राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीच्या नेत्यांकडून पाठपुरावा सुरू होता. मात्र, महापालिकेने सादर केलेल्या मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचा सुधारित आराखड्याला राज्य शासनाच्या मंत्रीमंडळाने अद्याप मान्यता दिलेली नाही. त्यामुळे केंद्र शासनाला सुधारित आराखडा वेळेत सादर झाला नाही. त्यामुळेच पुणे मेट्रोला एकूण प्रकल्पीय खर्चाच्या केवळ 0.१ टक्के इतका निधी केंद्राच्या अर्थसंकल्पात आज देण्यात आला.

७ वर्षांपासून पुणे मेट्रोचा प्रवास कागदावरच सुरू आहे. मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील वनाज ते रामवाडी मार्गाचा प्रस्ताव महापालिकेने २ वर्षांपूर्वी राज्य शासनाला व राज्य शासनाने एक वर्षांपूर्वी केंद्र शासनाला सादर केला. परंतु, केंद्र शासनाकडून अद्याप पहिल्या मेट्रो मार्गाला मान्यता दिलेली नाही. दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी महापालिकेतील सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक १0 जानेवारी २0१३ ला पुण्यात घेतली. त्यानंतर केंद्रीय नगर विकासमंत्री कमलनाथ व शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे व पिंपरी महापौर, पदाधिकारी व आयुक्तांची दिल्लीत बैठक झाली. त्यावेळी महापालिकेने पहिल्या टप्प्यातील दोन्ही मार्गांचा सुधारित आराखडा फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत सादर करावा. तसेच, ‘स्पेशल पर्पज व्हेईकल’ (एसपीव्ही)ची स्थापना केल्यानंतर अर्थसंकल्पात तरतूद करण्याचे आश्‍वासन कमलनाथ यांनी दिले होते. परंतु, राज्य शासनाकडून वेळेत प्रस्ताव गेला नसला तरीही मेट्रोसाठी गुंतवणूक म्हणून अर्थसंकल्पात ही तरतूद झाली आहे.

दिरंगाईचा फटका..
महापालिकेने सुमारे १0,१८३ कोटीचा सुधारित आराखडा राज्य शासनाला जानेवारी अखेर सादर केला. परंतु, याला राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाने अद्याप मान्यता दिलेली नाही. तसेच, हा प्रस्ताव केंद्र शासनाला सादर करण्यात आला नसल्याने अर्थसंकल्पात पुणे मेट्रोला भरीव तरतूद झाली नसल्याची शंका उपस्थित केली जात आहे.

No comments:

Post a Comment