Friday 17 May 2013

विविध कारणांमुळे महापालिकेत सभा तहकुबीचा इतिहास

विविध कारणांमुळे महापालिकेत सभा तहकुबीचा इतिहास: पिंपरी । दि. १६ (प्रतिनिधी)

जनहिताचे निर्णय घेण्यासाठी आणि विकासकामांच्या खर्चाला मंजुरी देण्यासाठी महापालिकेत सर्वसाधारण सभा आणि स्थायी समिती सभा होणे आवश्यक असते. परंतु विविध कारणांमुळे या सभा तहकूब करण्यात आल्या आहेत. एप्रिल २0१२ ते मे २0१३ या वर्षभरात सर्वसाधारण सभा तब्बल २२ वेळा, तर १६ वेळा स्थायी समिती सभा तहकूब केल्याची माहिती पुढे आली आहे.

सर्वसाधारण सभा ही मासिक सभा असते. ती दर महिन्याच्या २0 तारखेला घेतली जाते. तर स्थायी समिती सभा ही प्रत्येक आठवड्यात मंगळवारी घेतली जाते. दरमहा २0 तारखेला सुरळीतपणे झालीच, तर वर्षाकाठी अशा १२ सभा व्हायला हव्यात. परंतु कधी एखाद्या मुद्दय़ाला आक्षेप घेत विरोधकांनी घातलेला गोंधळ, तर कधी एखाद्या दुर्दैवी घटनेचा निषेध किंवा मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करून सभा तहकूब करण्यात आल्या. वर्षभरात तब्बल २२ वेळा सभा तहकूब केल्याचा विक्रम मनपात घडला. केवळ ९ वेळा सभा सुरळीत पार पडल्या. चित्रपट कलावंत, मंत्रालयातील मृत व्यक्ती, आरोग्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, दिल्लीतल्या अत्याचारातील मृत्यू झालेली तरुणी, स्थानिक पदाधिकार्‍यांच्या नातेवाइकांचे निधन अशा अनेक कारणांस्तव श्रद्धांजली सभा घेऊन सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आल्या आहेत.

विकासकामांना खीळ
महापालिका सभा वारंवार तहकूब करण्याचा सपाटा लावलेल्या नगरसेवक, पदाधिकार्‍यांकडून विकासकामाला खीळ बसल्याचा वेळोवेळी आरोप होतो. आयुक्त विकासकामांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करणार्‍या सदस्यांची कार्यपद्धती यानिमित्ताने निदर्शनास आली आहे. सभा, चर्चा, निर्णय झाले, तरच विकासकामांना गती मिळणार असल्याचे भान सदस्यांना राहिलेले नाही, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.

No comments:

Post a Comment