Thursday 22 November 2012

भाडे नाकारणार्‍या रिक्षाचालकांवर कारवाई

भाडे नाकारणार्‍या रिक्षाचालकांवर कारवाई: पुणे। दि. १९ (प्रतिनिधी)

स्टँडवर उभ्या असणार्‍यांकडून प्रवाशांना भाडे नाकारणार्‍या २00 रिक्षाचालकांवर वाहतूक शाखेने कारवाई केली असून, त्यांचा वाहन परवाना निलंबित करण्याची शिफारस आरटीओकडे करण्यात येणार आहे.

प्रवाशांची वाट पाहत असतानाही जवळचे भाडे नाकारणे, मीटरप्रमाणे पैसे न घेता जादा भाडे मागणे, नाही तर नकार देणे अशा रिक्षाचालकांविषयींच्या अनेक तक्रारी वाहतूक पोलिसांकडे येत होत्या. प्रवाशांना आपल्या कामाला जाण्याची घाई असल्याने ते त्याच वेळी तक्रार करण्यासाठी पुढे येत नसत. रिक्षाचालकांविरुद्धच्या या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी आजपासून या प्रकाराविरुद्ध मोहीम उघडली.

भाडे नाकारणार्‍या रिक्षाचालकांना पकडण्यासाठी त्यांनी युक्ती केली. रिक्षा स्टँडवर थांबलेल्या रिक्षाचालकांकडे साध्या वेशातील वाहतूक शाखेचे कर्मचारी, वाहतूक मित्र गेले. त्यांनी त्या त्या परिसरातील ठिकाणी जायचे असल्याचे सांगितले.

काही जणांनी त्यांना प्रतिसाद देऊन त्या ठिकाणी सोडले. मात्र, ज्यांनी सांगितलेल्या ठिकाणी जाण्यास नकार दिला अशा वेळी त्यांनी पोलिसांना बोलावून घेतले व संबंधित रिक्षाचालकाविरुद्ध तक्रार दिली. त्यानंतर वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍यांनी रिक्षाचालकावर दंडात्मक कारवाई केली. आज दिवसभरात शहरातील विविध ठिकाणी या पद्धतीने रिक्षाचालकांची परीक्षा पाहण्यात आली. त्यात काही पासही झाले. मात्र, पास झालेल्या रिक्षाचालकांची नोंद ठेवण्यात आलेली नाही. वाहतूक शाखेच्या परीक्षेत नापास झाल्याने २00 जणांना कारवाईला सामोरे जावे लागले. ही मोहीम अशीच सुरू राहणार असून, सामान्य नागरिकही याबाबतच्या तक्रारी २६१२२000 किंवा २६२0८२२५ या क्रमांकावर कळवू शकतील, असे वाहतूक शाखेचे उपायुक्त विश्‍वास पांढरे यांनी सांगितले. रिक्षाचालकांबरोबरच पुढील दीड महिन्यात पदपथावरून वाहन चालविणे, पदपथावर वाहन पार्क करणे, रस्त्याच्या वळणावर, बसथांब्यावर वाहन पार्क करणे, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे असे वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

दीड महिना चालणार मोहिम

वर्षाअखेरीस मद्यपान करुन वाहन चालविणार्‍यांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणावर वाढते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी व वाहनचालकांना शिस्त लागावी या हेतूने वाहतुक शाखेच्या वतीने पुढील दीड महिना बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध मोहिम राबविली जाणार आहे. त्यात दुचाकी वाहनांबरोबरच मोटारी, ट्रक, टेम्पो, बस यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. मोटार चालविताना सिटबेल्ट न वापरणार्‍या चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

पुणे शहर, उपनगर तसेच पिंपरी चिंचवड परिसरात आज दिवसभरात सुमारे २00 रिक्षाचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. या रिक्षाचालकांचा परवाना निलंबित करावा, अशी शिफारस प्रादेशिक परिवहन विभागाला करण्यात येणार आहे. विश्‍वास पांढरे -उपायुक्त, वाहतूक शाखा

No comments:

Post a Comment