Monday 10 December 2012

भेद माणसांनी केला! - माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील

भेद माणसांनी केला! - माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील: - कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या सोहळ्यात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे मत
पिंपरी । दि. ९ (प्रतिनिधी)

बुद्धिमत्ता हा जन्मसिद्ध हक्क नाही, ती परमेश्‍वराची देणगी आहे. परमेश्‍वराने कोणताही भेदभाव केला नाही, तो माणसांनी केला आहे. शिक्षणातून दुर्बलांना बळ देण्याचे काम कॅम्प एज्युकेशन सोसायटीने केले आहे. ही कौतुकास्पद बाब आहे, असे गौरवोद्गार माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी आज काढले.

प्राधिकरणातील कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या सांगता समारंभात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी देवीसिंह शेखावत होते. व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती, सचिव मोहिनी तेलंग, खजिनदार वसंत पवार, अमरसिंह राणे आदी उपस्थित होते.

या वेळी ‘शतकोत्तर रजतरंग’ स्मरणिकेचे प्रकाशन प्रतिभाताईंच्या हस्ते झाले. या वेळी उद्योगपती रसिकलाल धारिवाल, प्रतिभाताईंच्या कन्या ज्योती राठोड, कष्टकर्‍यांचे नेते बाबा आढाव यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

पाटील म्हणाल्या, ‘‘महात्मा जोतिबा फुलेंच्या प्रेरणेतून शेतकरी, कष्टकरी गरीब कुटुंबीयांना शिक्षण देण्यासाठी या संस्थेची सुरुवात झाली. दीनदलित महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी समाजसुधारकांचे मोलाचे योगदान आहे. महिलांना साक्षर करण्यात फुलेंचे योगदान मोलाचे आहे. गरिबांबद्दल सहानुभूती असणे वेगळे परंतु कणव असणे गरजेचे असते. प्राणांची पर्वा न करता सावित्रीबाई फुलेंनी मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले. स्फूर्तिदायक इतिहास या कॅम्प एज्युकेशनचा असून, आचार्य प्रल्हाद केशव अत्रेंसारख्या दिग्गजांनी योगदान दिल्याने संस्थेचा वटवृक्ष बहरला आहे. वंचित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम मोलाचे आहे.’’

‘‘बुद्धिमत्ता देण्यात परमेश्‍वर जात-पात कधीच पाहत नाही. शिक्षणाला तिसरा डोळाही मानला गेला आहे. सामाजिक समानता आर्थिक समानता आणण्याचे कार्य देशात होत आहे. ते आणखी प्रभावीपणे होण्याची गरज आहे. मजूर समाजाच्या मुलांनाही शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम ही संस्था करीत आहे. आर्थिक नियोजन व व्यसनाधीनतेने आजही हा समाज ग्रासलेला आहे. त्यामुळे विकासापासून वंचित राहिला आहे. मजुरांच्या विकासासाठी त्याची व्यसनाधीनता दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.’’

संचेती यांनी प्रास्ताविक केले. मंजिरी ब्रrो यांनी सूत्रसंचालन केले. सहिष्णूतेस दाद
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे भाषण सुरू होताच अचानक वीज गेली. त्यामुळे संयोजकांची पुरती तारांबळ उडाली. १५ मिनिटांनी वीज आली. त्यावर प्रतिभाताई म्हणाल्या, ‘‘१२५ वर्षांची ज्ञानदानाची परंपरा या संस्थेला आहे. दुर्बल वंचित घटकांसाठी त्यांनी कार्य केले आहे. त्यामुळे काही वेळ वीज गेली म्हणून विचलित होण्याचे कारण नाही. अडचणीतून तुम्ही अनेक वर्षे काढली. त्यामुळे झालेली गैरसोय त्यापुढे काहीच नाही.’’ प्रतिभाताईंच्या या सहिष्णूतेला उपस्थितांनी दाद दिली.

No comments:

Post a Comment