Saturday 10 August 2013

‘तरच समाज सुरक्षित राहील’

पिंपरी : साध्या गणवेशातला प्रत्येक नागरिक हा पोलीस आहे. आजच्या काळात प्रत्येक सामान्य नागरिकांतील पोलीस दक्ष व जागृत असायला हवा तरच समाजविघातक कृत्य करणारे पकडले जाऊन समाजात शांतता व सुरक्षा वाढू शकेल, असे मत रस्ता सुरक्षा पोलीस अधिकारी आर. एस. इनामदार यांनी व्यक्त केले.
मॉडर्न हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना आर. एस. पी. अंतर्गत सुरक्षा विषयक मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पूर्वीच्या काळात युद्धामध्ये मोठय़ा प्रमाणावर माणसे मारली जात होती. आजच्या काळात मात्र सुरक्षा विषयक जागृती नसल्याने माणसे मरत आहेत. अनेक वेळा बेवारस वस्तूकडे दुर्लक्ष झाल्याने बॉबस्फोट झाले आहेत. अशावेळी बेवारस वस्तूची तात्काळ माहिती नजीकच्या पोलीस चौकीत द्यायला हवी. यामुळे अशा दुर्घटना टळू शकतील.
या वेळी विद्यार्थ्यांनी मोबाईलचा दुरुपयोग टाळला पाहिजे असे सांगून तुम्ही केलेल्या प्रत्येक मेसेज व कॉलचे रेकॉर्ड पोलिसांना मिळते असा दुरुपयोग केल्यास कायदेशीर कारवाई होऊन शिक्षा होऊ शकते हे काही उदाहरणावरून त्यांनी सांगितले.
प्रत्येक विद्यार्थ्याने घरातील सदस्यांमध्ये तसेच आसपासच्या व्यक्तीमध्ये ही जागृती करावी. तरच समाज अधिक सुरक्षित होऊ शकेल. या वेळी आरएसपी प्रशिक्षक गजानन राजमाने, शाळा समिती अध्यक्ष शरद इनामदार, मुख्याध्यापिका छाया आंधळे, गंगाधर सोनवणे, शिवाजी अंबिके, राजीव कुटे उपस्थित होते. (प्रतिनिधी)

No comments:

Post a Comment