Saturday 10 August 2013

एलबीटी नोंदणीस अल्प प्रतिसाद

पिंपरी : व्यापारी, उद्योजकांनी एलबीटी नोंदणी करावी, यासाठी महापालिकेने गेल्या तीन महिन्यांत मोबाइलवर सुमारे ४ लाख एसएमएस पाठवले आहेत. ९,६३२ व्यापार्‍यांना ई-मेल केले आहेत. तसेच १३,३५९ व्यापार्‍यांना पत्र पाठवून कळविले आहे. असे असताना २९ हजार ३ ६७ व्यापारी, उद्योजकांपैकी केवळ ६ हजार लोकांनी नोंदणी केली आहे. 
व्हॅट नोंदणी असलेल्यांची संख्या २५0२५ इतकी आहे. व्हॅटनोंदणी धारकांपैकी १२ हजार ६५३ लोकांनी नोंदणी करून क्रमांक मिळविला आहे. अन्य ४३४२ लोकांनी अद्याप नोंदणी करून क्रमांक मिळविलेला नाही. महापालिकेच्या व्यवसाय परवाना विभाग तसेच दुकाने नोंदणी कार्यालयाकडे नोंदणी असलेल्यांची संख्या समारे ३0 हजार आहे. एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांत महापालिकेला १९८ कोटींचे एलबीटीचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षीच्या एप्रिल, मे, जून महिन्यात मिळालेल्या जकातीच्या तुलनेत मोठी घट आहे. गतवर्षी एप्रिल,मे,जून या तीन महिन्यांचे जकात उत्पन्न २९३ कोटी होते. यंदा एलबीटीचे उत्पन्न २२१ कोटी आहे. त्यामध्ये ७१ कोटींचा फरक पडला आहे. 
औद्योगिक मंदी दूर होण्यास विलंब झाला तर १२00 कोटींचे उद्दिष्ट साध्य करता येणार नाही. दीडशे कोटींची तूट सोसावी लागणार आहे. वर्षभरात २४ टक्के घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 
नोंदणीस अल्प प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे उत्पन्न वाढीचा आलेख हळूहळू वाढत आहे. एलबीटी न भरणार्‍या मध्यम व छोट्या व्यापार्‍यांची संख्या अधिक आहे. एलबीटी नियमावलीत नोंदणी न करणार्‍यांविरुद्ध कारवाईची तरतूद आहे. जूनपासून धनादेशाद्वारे एलबीटी भरण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. (प्रतिनिधी)

व्यापार्‍यांचा असहकार
एलबीटी नोंदणी व वसुलीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महापालिकेकडून विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. एलबीटीच्या जाचक अटी कमी कराव्यात. या मागणीसाठी व्यापारी संघटनांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला. त्याची दखल घेतली गेली. अनेक अटी शिथिल केल्या. तरिही व्यापार्‍यांचे समाधान झालेले नाही. आणखी काही अटी शिथिल कराव्यात, अशी त्यांची आग्रही मागणी असून जोपर्यंत व्यापार्‍यांनी सुचविलेल्या सुधारणा होत नाहीत, तोपर्यंत एलबीटी व अन्य कर कोणी भरू नये. अशी असहकाराची भूमिका व्यापार्‍यांनी घेतली असल्याने लाखो एसएमएस, ई-मेल, पत्र पाठवूनही नोंदणीस अल्प प्रतिसाद मिळाला.

No comments:

Post a Comment