Tuesday 27 November 2012

अनुदान थेट बँकेत

अनुदान थेट बँकेत: पुणे। दि. २४ (विशेष प्रतिनिधी)

विविध सरकारी योजनांनुसार दिल्या जाणार्‍या अनुदानाची रक्कम ‘आधार कार्डा’शी निगडित संगणकीय व्यवस्थेच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाची सुरुवात देशातील निवडक ५१ जिल्ह्यांमध्ये १ जानेवारीपासून केली जाईल. यात महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांचा समावेश असेल. केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी आज येथे ही माहिती दिली.

एका कार्यक्रमात बोलताना चिदम्बरम म्हणाले की, अशा प्रकारे ‘आधार’च्या माध्यमातून लाभार्थ्यांना रोखीने अनुदान देण्याची योजना डिसेंबर २0१३च्या अखेरपर्यंत संपूर्ण देशात राबविली जाईल.

ही योजना राबविण्यासाठी ८0 टक्क्यांहून जास्त लोकांना आधार कार्ड देण्याचे काम पूर्ण झालेल्या १५ राज्यांमधील ५१ जिल्हे सुरुवातीस निवडले गेले आहेत. आधार कार्डे जारी करण्याचे काम इतर ठिकाणी एकीकडे अधिकाधिक भागांमध्ये पूर्ण करत आणायचे व त्यानुसार अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याच्या योजनेचीही व्याप्ती दुसरीकडे वाढवीत न्यायची, असा सरकारचा इरादा आहे. त्याचबरोबर देशातील सर्व बँकांमध्ये ‘कोअर बँकिंग सोल्युशन्स’ ही संगणकीय प्रणालीही सुरू झालेली असेल. २0१४ मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांना सामोरे जाणार्‍या ‘यूपीए’ सरकारच्या दृष्टीने राजकीय लाभ घेण्यासाठी थेट बँकेत अनुदान जमा करण्याची योजना राष्ट्रीय रोजगार हमी योजनेहून अधिक महत्त्वाची आहे. ही योजना यशस्वी झाली तर दरवर्षी सरकारी तिजोरीतून चार लाख रुपयांहून अधिक रक्कम थेट लाभार्थ्यांना मिळेल. हे लक्षात घेऊनच पंतप्रधान या योजनेच्या प्रगतीवर जातीन लक्ष ठेवून आहेत.

No comments:

Post a Comment