Tuesday 27 November 2012

भाडेकरू नोंदीबाबत पोलिसांचा ढिसाळपणा

भाडेकरू नोंदीबाबत पोलिसांचा ढिसाळपणा: पुणे। दि. २६ (प्रतिनिधी)

घातपात करणारे अतिरेकी एखादी खोली किंवा फ्लॅट भाड्याने घेऊन राहत असल्याचे पुण्यात वारंवार दिसून आल्यानंतरही पोलीस त्याबाबत अद्यापही ढिलाई दाखवीत आहेत. ग्रामीण पोलिसांकडे भाडेकरूंच्या संख्येची एकत्रित नोंदच नसल्याचे आणि पोलीस ठाण्यांकडूनही घरमालकांना भाडेकरूंची नोंदणी करण्याबाबत सूचना नसल्याचे आढळून आले.

पुणे शहर पोलिस आयुक्तांनी घरमालकांना सावध करून भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यात देण्याचे आवाहन केले होते, त्याला शहरात चांगला प्रतिसादही मिळाला. ज्यांनी अशा नोंदी केल्या नव्हत्या, त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले. भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यात दिल्यास भाडेकरू त्या माहितीचा न्यायालयीन पुरावा म्हणून वापर करण्याची शक्यता असल्याने सर्वच जुन्या भाडेकरूंची नोंद झालेली नाही. तथापि, नव्याने राहण्यासाठी आलेल्या भाडेकरूंची नोंद ठेवणे आवश्यक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हद्द पालिकेची आणि अंमल ग्रामीण पोलिसांचा असे चित्र काही उपनगरांमध्ये आहे.

घातपात करणार्‍यांना पुणे शहरात चाप लावण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला असला तरी ग्रामीण भागात मात्र रान मोकळे आहे.

जंगली महाराज रस्त्यावर साखळी बाँबस्फोट करणार्‍यांनी पिंपरी चिंचवड परिसरातील घरात आश्रय घेतला असल्याचे दिसून आले आहे.

भाडेकरूची पूर्ण माहिती, छायाचित्र, मोबाईलनंबर यांची माहिती घरमालकांनी भरून द्यावी यासाठी पुणे शहर पोलिसांनी पोलीस ठाण्यांच्या बाहेर स्वतंत्र टपालपेटी ठेवल्याचे दिसून येते. पुणे ग्रामीण पोलीस दलातच याबाबत ढिसाळपणा आहे. हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठय़ा प्रमाणात सोसायट्या आणि घरे आहेत. शहर पोलिसांची हद्द राजाराम पुलापर्यंतच असून त्यापुढे हवेली पोलीस ठाण्याची हद्द सुरू होते. या ठिकाणी हिंगणो, आनंदनगर, वडगाव, धायरी, नांदेड, किरकटवाडी अशा ठिकाणी मोठय़ा प्रमाणात सोसायट्या आहेत.त्यामध्ये मोठय़ा संख्येने भाडेकरूही राहतात.

No comments:

Post a Comment