Tuesday 6 November 2012

कागदोपत्री कुटुंब विभक्त होण्याचे प्रमाण दुप्पट

कागदोपत्री कुटुंब विभक्त होण्याचे प्रमाण दुप्पट: पिंपरी । दि. १ (प्रतिनिधी)

केवायसीमुळे पिंपरी-चिंचवड परिसरासाठी असणार्‍या दोन अन्नधान्य पुरवठा कार्यालयात शिधापत्रिका (रेशनकार्ड) विभक्त करण्यासाठी नागरिकांची सध्या झुंबड उडाली आहे. महा ई-सेवा केंद्रामुळे सध्या या केंद्रात प्रत्यक्ष गर्दी दिसत नसली तरी कार्यालयीन कामाचे प्रमाण वाढले आहे.

घरगुती गॅसबाबत केंद्र शासनाने निर्णय जाहीर केल्यानंतर केवायसी अनिवार्य केले आहे. गॅसबाबत असणार्‍या सवलतीचा फायदा मिळावा, यासाठी कुटुंब विभक्त करण्यासाठी सध्या नागरिक व्यस्त आहेत. निगडीतील अन्नधान्य वितरण (परिमंडळ अ विभाग) कार्यालयाअंतर्गत पिंपरी, चिंचवड, वाल्हेकरवाडी, रावेत, पुनावळे, किवळे, थेरगाव, निगडी, देहूरोड, देहूगाव, यमुनानगर, खराळवाडी, तळवडे, चिखली, नेहरूनगर अशा विविध भागांचा समावेश होतो. मागील महिन्यापर्यंत या कार्यालयांतर्गत १ लाख ५३ हजार १0१ शिधापत्रिका धारकांची नोंदणी झाली असून या कार्यालयात दिवसाला नवीन कार्ड, नाव बदलणे, पत्ता बदलणे अशा कामांसाठीचे अर्ज येतात. त्याचे प्रमाण दिवसाला सुमारे पावणे दोनशे आहे. केवायसीमुळे कार्यालयात येणार्‍या अर्जांमध्ये निम्मे अर्ज हे कुटुंब विभक्त होणारे असतात. शिधापत्रिकेतील एकत्रित कुटुंबातील नावांची फोड करावी, असे अर्ज अधिक आहेत.

दुसरे कार्यालय शिवाजीनगर येथे (परिमंडळ फ कार्यालय) आहे. त्या अंतर्गत मोशी, दिघी, चर्‍होली, भोसरी, कासारवाडी, दापोडी, बोपखेल, फुगेवाडी, सांगवी, नवी सांगवी, औंध, पाषाण, पिंपळे निलख, पिंपळे-सौदागर, पिंपळे गुरव भागांचा समावेश आहे. सध्या १ लाख २५ हजार शिधापत्रिकाधारक असून दिवसाला दीडशे अर्ज येतात.

No comments:

Post a Comment