Tuesday 1 January 2013

‘लिटाका फार्मा’समोर ठिय्या

‘लिटाका फार्मा’समोर ठिय्या: पिंपरी । दि. २९ (प्रतिनिधी)

४0 दिवसांत सर्व हिशोब देतो असे सांगून लिटाका फार्मा व्यवस्थापनाने दीड वर्षापासून झुलवत ठेवल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. वसई, जेजुरीतील युनिटमध्ये पुनर्वसन केलेल्या कामगारांचेही जूनपासूनचे पगार मिळालेले नाहीत. पगारासह २0 ते २५ वर्षांच्या सेवेतील एकूण हिशोब मिळावा, या मागणीसाठी येथील ७९ कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मोरवाडीतील लिटाका फार्मा कंपनीच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. हिशोब मिळेपर्यंत येथून न हालण्याचा पवित्रा कामगारांनी स्वीकारल्याने शनिवारी येथे तणावाचे वातावरण होते.

औषधनिर्मिती करणारी ट्वायलाईट लिटाका फार्मा कंपनी आर्थिक मंदीमुळे अडचणीत आली. मार्च २0११ पासून कंपनी बंद ठेवण्यात आली. ३0 जून २0११ ला कंपनीने गाशा गुंडाळल्याने कामगार रस्त्यावर आले. त्यापैकी ३0 कामगारांचे वसई आणि जेजुरी येथील युनिटमध्ये पुनर्वसन करण्यात आले. तर ज्या कामगारांनी राजिनामे सादर केले त्यांना काहीप्रमाणात हिशोब देण्यात आला. परंतु, अजूनही भविष्य निर्वाहनिधीची रक्कम कंपनीने दिली नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. ज्या ३0 कामगारांचे अन्य युनिटमध्ये पुनर्वसन केले होते, त्यांनाही जून २0१२ पासूनचे पगार देण्यात आलेले नाहीत. मोरवाडीतील युनिट बंद करतेवेळी ४0 दिवसांत तुमचा सर्व हिशोब दिला जाईल, असे आश्‍वासन कामगारांना देण्यात आले होते. परंतु त्यास आता दीडवर्ष उलटले. प्रत्येकवेळी आश्‍वासनांशिवाय कामगारांच्या हातात काही पडत नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे. भारतीय कामगार सेनाही कामगारांच्या बाजूने उभी राहात नसल्याबद्दल कामगारांमधून नाराजी व्यक्त होत आहे. नोव्हेंबरमध्ये कामगारांच्या हातात धनादेश देत त्यांची बोळवण करण्यात आली; परंतु हे धनादेशही बॅँकेत वटत नसल्याने कंपनीकडून फसवणूक सुरू असल्याची कामगारांची तक्रार आहे.

कंपनी व्यवस्थापन हिशोब देण्यात चालढकल करीत असल्याने गुजराण करणे मुश्किल झाले आहे. संसार उघड्यावर आल्याची भावना महिला कामगार तसेच अन्य कामगारांच्या पत्नींकडून व्यक्त केली जात आहे. मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न होणे बाकी आहे. व्यवस्थापनाने त्वरित आमचे हिशोब द्यावेत, अशी कामगारांची अपेक्षा आहे. कामगारांचे प्रत्येकी किमान ३ ते ४ लाख रुपये कंपनीकडून येणे असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. याबाबत कंपनीतील मनुष्यबळ विकास अधिकारी विश्‍वास आहेर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

No comments:

Post a Comment