Tuesday 1 January 2013

रात्रीत तीन घरफोड्या

रात्रीत तीन घरफोड्या: चिंचवड । दि. २९ (वार्ताहर)

येथील दळवीनगर व इंदिरानगर परिसरात तीन घरफोड्यांत चोरट्यांनी सुमारे साडेसात लाखांचा ऐवज लंपास केला. परिसरात सदनिका, मंदिरांनाही चोरट्यांनी लक्ष केले असून शिवलिंग मंदिरातदेखील चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे असतानाच वाहन, मंगळसूत्र चोरी व घरफोडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

चिंचवड पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून ठसेतज्ज्ञ व श्‍वानपथकास पाचारण केले. ‘तेजा’ या श्‍वानने मंदिराच्या मागील बाजूस बिजलीनगर रस्त्यापर्यंत माग काढला. परंतु येथून पुढे चोरटे वाहनातून पसार झाले असावे असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

दळवीनगर, भोईरनगर, प्रेमलोक पार्क, इंदिरानगर परिसरात भुरट्या चोर्‍या, घरफोड्या व मंगळसूत्र चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. या भागात बालगुन्हेगारांनी चोरीचे अनेक प्रकार केल्याचे उघड झाले आहे. या बालगुन्हेगारांना नागरिकांनी पकडून दिल्यानंतर त्यांच्यावर कारवाई झाल्याने नागरिक व व्यावसायिकांनी सुटकेचा नि:श्‍वास टाकला होता. परंतु घरफोडीचे सत्र सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

- दळवीनगरातील गणपती मंदिर परिसरात शरद विष्णू ठवरे (२२) यांच्या बंद असलेल्या घराच्या दरवाजाचे कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. बेडरुममधील कपाटाची तिजोरी उचकटून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा सुमारे पाऊणेचार लाखांचा ऐवज लंपास केला. ठवरे यांनी फिर्याद दिली आहे.

- शनिवारी पहाटे इंदिरानगरातील शिवहरी इमारतीतील रणजित संपत पवार यांच्या सदनिकेच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कपाटातील १२ तोळे सोन्याचे दागिने व १५ हजार रोख रक्कम असा ऐवज लंपास केला. पवार कामानिमित्त मुंबईला गेले असल्याने त्यांच्या पत्नी शुभांगी या सायंकाळी ७ नंतर जवळच असलेल्या आपल्या भावाकडे गेल्या होत्या. रात्री उशीर झाल्याने त्या भावाकडेच थांबल्या. याचा फायदा घेत त्यांची सदनिका फोडण्यात आली.

- चोरट्यांनी इमारतीतील इतर सदनिकांच्या दाराच्या कड्या लावल्या होत्या. याच इमारतीशेजारी शिवकृपा इमारत असून तेथील ११ क्रमांकाच्या सदनिकेतील दिलीप गायकवाड हे कुटुंबासह पाच दिवसांपासून बाहेरगावी गेले आहेत. त्यांच्या घराच्या दरवाजाचे लॅच, कडी-कोयंडा तोडून चोरटे घरात घुसले. घरातील देवघरापासून ते माळ्यावरील बॅगा व फाईलपर्यंतचे सर्व सामान उचकटून चोरटे पसार झाले.

- घरातील धान्याची कोठी, फ्रीज अशा सर्व ठिकाणी चोरट्यांनी चाचपणी केली. गायकवाड कुटुंब बाहेरगावी असल्याने चोरीच्या वस्तू व मुद्देमालाची किमत समजू शकली नाही. याच इमारतीच्या बाजूला शिवलिंग मंदिर आहे. या मंदिराच्या भांडार विभागाची कडीकोयंडे तोडून चोरट्यांनी कपाटाचे कुलुप उचकटले. शेजारीच असलेल्या दानपेटीचे कुलुप तोडून ४ हजार रुपये लंपास केले.

No comments:

Post a Comment